परिपत्रकाचा निषेध : आश्रमशाळेतील शिक्षकेत्तर कर्मचारी संकटातपवनी : शासन निर्णयामुळे यापुर्वीच मोठया संख्येने शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त होण्याची भिती व्यक्त होत असतानाच शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने विजाभज आश्रमशाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत त्यांना ‘काम नाही, वेतन नाही’ धोरण लागू करण्याकरिता शासन परिपत्रक काढले. या परिपत्रकाचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे. या परिपत्रकाचा भंडारा जिल्हा आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाने निषेध केला आहे.या परिपत्रकात दिलेल्या निर्देशाअनुसार जर आश्रमशाळा बंद पडल्या किंवा विद्यार्थी संख्येअभावी शिक्षक अथवा शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त झाल्यास ‘‘जोपर्यंत त्यांचे इतर आश्रमशाळेत समायोजन होत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे वेतन देता येणार नाही’’ असे नमुद आहे. या कर्मचाऱ्यांचे इतर आश्रमशाळेत समायोजन झाल्यानंतरच त्यांचे वेतन सुरु होईल. या कर्मचाऱ्यांचे शासकीय संस्थामध्ये समायोजन होणार नाही.आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी ईमाने इतबारे काम करतात. शाळा बंद पडली अथवा विद्यार्थी संख्येअभावी अतिरिक्त होण्यास शिक्षक, कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात येते. त्यांचे समायोजन करण्याकरिता अनेक वर्षाचा कालावधी जातो. या कालावधीत अनेक वर्ष त्यांचे वेतन बंद राहणार आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट या परिपत्रकामुळे आली आहे. या परिपत्रकामुळे राज्यातील हजारो कर्मचाऱ्यांचे कुटूंब उघडयावर येणार आहेत. या परिपत्रकांचा राज्यात सगळीकडे निषेध होत आहे हे परिपत्रक तत्काळ रद्द करण्याच्या मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत तागडे यांनी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविले आहे. सामाजिक न्यायमंत्री आश्रमशाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे भविष्य लक्षात घेवून उपाययोजना करतील काय, असा सवाल आहे. (तालुका प्रतिनिधी)परिपत्रक रद्दचे निर्देशमंत्रालयात आश्रमशाळा कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत झालेल्या निर्णयाअनुसार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी हे परिपत्रक रद्द करुन सुधारित परिपत्रक काढण्याचे निर्देश कक्ष अधिकाऱ्यांना दिले. मंत्रिमहोदयांनी केवळ आश्वासन दिले आहे. त्यामुळे सुधारित परिपत्रक निघेपर्यंत संघर्ष सुरुच राहणार आहे. राज्यस्तरावर एका मोठ्या आंदोलनाची तयारी सुरु आहे. - लक्ष्मीकांत तागडे अध्यक्ष, भंडारा जिल्हा आश्रमशाळा शिक्षक -शिक्षकेत्तर कर्म संघ
‘त्या’ कर्मचाऱ्यांना ते परिपत्रक घातक
By admin | Published: April 07, 2016 12:32 AM