भंडारा : जिल्ह्यातील गायमुख (छोटा महादेव) येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. गायमुख परिसरातील बाबाची मळी ते पांगडी जलाशय भागात रोप-वेची निर्मिती करावी, अशी मागणी ग्रीनहेरिटेज संस्थेमार्फत करण्यात आली आहे.अंबागड किल्ल्याचे पुरातत्व विभागामार्फत अनेक कामे करण्यात आली आहे. गायमुख येथे आल्यावर चौरागड या टेकडीवरून निसर्गरमनीय पांगडी जलाशयाचे विहंगम दृश्य दिसते. गायमुख, गायखोरी, अंबागड अशा या सातपुडा पर्वत श्रेणीत मधोमध असलेले व गर्द वनराईच्या सावलीत विसावलेले पांगडी जलाशय हे निसर्गाची एक देण लाभलेली आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या परिसरातील तापमान फक्त २२ ते २३ अंश डिग्री एवढे असते. याबाबतची नोंद नूतन महाराष्ट्र विद्यालयाचे शिक्षक संजय बांडेबुचे यांनी घेतली आहे. पार्वतीचे हिवर या क्षेत्रातून किंवा चौरागड-पांगडी जलाशय-आंबागड किल्ला असे रोप-वेची व्यवस्था केल्यास पर्यटनाला चांगला वाव मिळू शकतो यासंदर्भात ग्रीनहेरिटेज पर्यटन पर्यावरण संस्थेतर्फे शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे संस्थेचे अध्यक्ष मो. सईद शेख यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी) महाशिवरात्रीला येतात लाखो भाविकदरवर्षी महाशिवरात्रीला विदर्भासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून जवळपास दोन लाखांपेक्षा भाविक दर्शनासाठी येत असतात. ग्रीन हेरिटेजच्या पाठपुरावामुळे गायमुखला पर्यटनस्थळालाचा दर्जा मिळाला. तसेच ५० लाखांची रक्कम मिळून विविध विकास कामे करण्यात आली. परंतु पर्यटनाची कामे जशी व्हायला हवी तशी झालेली नाही. पर्यटकांसाठी विश्रामगृहाचे निर्माण करण्यात आले पण सोयी-सुविधा उपलब्ध नाहीत. मिटेवानी, जांब या मार्गाने येणाऱ्या भाविकांना अरूंद रस्ते, रस्त्यांवरील खड्डे याचा त्रास सहन करावा लागतो. महाशिवरात्रीला येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता शासनाने याबाबत ठोस पाऊले उचलावित, अशी मागणीही होत आहे.
‘त्या’ पर्यटनस्थळी हवा रोप-वे
By admin | Published: February 08, 2017 12:48 AM