भंडारा : राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सन २०२३-२४ यावर्षीच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू, व्यक्ती यांच्याकडून २६ जानेवारी २०२५ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाने शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी सुधारित नियमावली तयार केली आहे.
उल्लेखनिय कार्यासाठी होणार सन्मान ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरिता जीवन गौरव पुरस्कार, क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला), शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडू आणि महिला क्रीडा मार्गदर्शक, असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंच्या सन्मानासाठी... क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ क्रीडा महर्षी, क्रीडा मार्गदर्शक यांचा सन्मान करण्याच्या अनुषंगाने शासनाच्या क्रीडा विभागातर्फे हा पुरस्कार देण्यात येत असतो.
अर्ज भरण्यासाठी नियम व अटी काय? तीन वर्षात खेळाडूने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी बजावलेली असावी. अर्जात तसा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक आहे.
अर्ज भरण्याला सुरुवात १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
क्रीडा पुरस्काराचे स्वरूप काय? विजेत्यांना स्मृतिमानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच पन्नास हजार रुपये मानधन दिले जाते. शासकीय तथा निमशासकीय अधिकारी व कर्मचारी पात्र ठरल्यास पंचवीस हजार मानधन, एसटीचा परवाना दिला जातो.
अर्ज कसा भरणार? अर्ज http://sports.maharasht ra.gov.in या ऑनलाइन साईटवरील स्क्रोलिंग लिंकमध्ये जाऊन करता येतो.
"जिल्ह्यात या पुरस्कारांसाठी जनजागृती करण्यात येत आहे. पात्रताधारक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी क्रीडा विभागाच्या ऑनलाइन संकेतस्थळावरून २६ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा." - लतिका लेकुरवाळे, जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा.