लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात मशिदीवरील भोंगे काढण्यावरून वादंग माजविला जात आहे. ज्यांना भोंगे लावायचे असेल तर त्यांनी खुशाल लावावेत. राज ठाकरे यांच्या भूमिकेचा आम्ही विरोध करतो. ते मंदिरावर भोंगे लावू शकतात; पण भोंगे काढण्यावरून धर्माधर्मात वितुष्ट आणून राजकारण करू नये, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.भंडारा येथील विश्रामगृहात सायंकाळी ५ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ना. आठवले म्हणाले, केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम आहे. गत आठ वर्षांपासून मोदी शासनाने विविध लोकोपयोगी योजना आणल्या आहेत. जवळपास ८५ टक्के नागरिक सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत येतात. जनधन योजना असो की उज्ज्वला. अनेक योजनांमधून अनेक गरीब व गरजू लोकांना लाभ मिळालेला आहे आणि अजूनही मिळत आहे. केंद्र शासनाने ‘सबका साथ सबका विकास’ हेच धोरण अवलंबविल्याने पाच राज्यांतील निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाले. हीच बाब विरोधकांना पचत नाही त्यामुळे ते वादंग घालत आहेत. येणाऱ्या काळातही निवडणुकीवर आमचे लक्ष आहे. २०२४ मध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधानपदी आरूढ होतील, असेही ते म्हणाले. रस्ते विकासाच्या माध्यमातून देशपातळीवर विकासाची गंगा प्रवाहित करण्यात आली आहे. मात्र नागरिकांना भ्रमित करण्यासाठी धर्माधर्मात वाद निर्माण केला जात आहे.भाेंगे काढण्याची भूमिका ही संविधानविराेधी आहे. सगळ्या रंगाला घेवून साेबत जायचे आहे. सर्वच रंगाचा सन्मान केला पाहिजे, असे ना. आठवले यांनी सांगितले. भारतात श्रीलंकेसारखी कुठलीही स्थिती नाही. मात्र स्वत:च्या अवस्थेवरुन देशाची अवस्था सांगण्याची गरज नाही, असा टाेलाही एका नेत्याला लगावला. पत्रकार परिषदेला आरपीआयचे जिल्हाध्यक्ष असीत बागडे व पदाधिकारी उपस्थित हाेते.
राज्य सरकार पडेल तर आम्ही बनवू - महाराष्ट्रात सध्या जे सरकार आहे ते पडत नाही. सरकार पाडण्यासाठी काँग्रेसने या सरकारमधून आपला पाठिंबा काढला पाहिजे, यासाठी नाना पटोले यांनी पुढाकार घ्यावा. राज्यातील विद्यमान सरकार पडले तर आम्ही सरकार बनवू, असा आत्मविश्वासही ना. आठवले यांनी व्यक्त केला. युती शासनाच्या काळातील कामांचा आढावा देताना ना. आठवले म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आल्या. याशिवाय त्यांच्याच काळात दीक्षाभूमीला शंभर कोटींचा निधी मिळाला. इंदू मिल येथे भव्य स्मारक घडत आहे.