भंडारा : कोरोना संक्रमण महामारीमुळे शाळा, महाविद्यालय पूर्णतः बंद होते. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी दुसऱ्या लाटेचा परिणाम जाणवला. परिणामी उन्हाळी सुट्टीत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना प्रत्यक्षरीत्या देता आला नाही. त्याऐवजी बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. परंतु अडीचशे रुपयांसाठी हजार रुपयांचे खाते बँकेत उघडावे लागणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी स्थिती पालकांसमक्ष उभी ठाकली आहे.
शैक्षणिक वर्तुळात काही ना काही उपक्रम सातत्याने सुरू असतात. मात्र गत दीड वर्षापासून कोरोना महामारीने सर्वच गणित बिघडविले आहे. उन्हाळी सुट्टीत शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना अप्रत्यक्षरीत्या देता आला नाही. त्याऐवजी संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांचे बँकेत खाते नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांना बँकेत खाती उघडावी लागणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले होते. त्याअंतर्गत पालक वर्गाने आपल्या पाल्यांचे बँकेत खाते उघडले आहे, तर कुणी त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र दीडशे रुपयांसाठी बँकेत खाते उघडण्यासाठी हजार रुपये आधी डिपॉझिट करावे लागणार आहेत. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना १५६ रुपये, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना २३४ रुपये शालेय पोषण आहाराचे पैसे मिळणार आहेत. मात्र बँक खात्यात अकाउंट उघडण्यासंदर्भात पालकांची डोकेदुखी वाढली आहे.
बॉक्स
बँकेत खाते उघडण्यासाठी लागणार हजार रुपये
राष्ट्रीयीकृत बँक किंवा स्थानिक बँकेत खाते उघडायचे म्हटल्यास त्याआधी काही न काही रक्कम डिपॉझिट भरून खाते उघडता येतात. शून्य रुपयात खाते उघडता येतात, मात्र त्याची नियमावली थोडी वेगळी आहे. आता शालेय पोषण आहारअंतर्गत विद्यार्थ्यांची खाती उघडली जाणार असल्याने सर्वात प्रथम पालकांना त्या खात्यात हजार रुपये टाकून खाते उघडावे लागणार आहे. त्यामुळे आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी स्थिती पालकांसमोर उभी राहिली आहे. थोड्या पैशांसाठी एवढी अडचण निर्माण करावी काय? असा उपरोधिक सवालही पालकगण विचारीत आहेत.
साधा बॉक्स
आकडेवारीवर भर घातल्यास पहिलीची विद्यार्थी संख्या १४ हजार ०८, दुसरीची १६ हजार ५००, तिसऱ्या वर्गातील विद्यार्थी संख्या १७ हजार ५४५ इतकी आहे. चौथ्या वर्गात १७ हजार २०९, तर पाचव्या वर्गात १६ हजार ४७ विद्यार्थी आहे. सहाव्या वर्गात १७ हजार ९६१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सातव्या वर्गात १७ हजार ९०० तर आठव्या वर्गात १८ हजार ४०० विद्यार्थी आहेत. या सर्वांना शालेय पोषण आहारअंतर्गत उन्हाळ्यात सुट्टीतील धान्य रूपाने पैसे मिळणार आहेत.
क़ोट बॉक्स
कोरोनामुळे आधीच आर्थिक चणचण भासत आहे. त्याउपर आता बँकेत खाते काढण्यासाठी हजार रुपये द्यावे लागणार आहेत. काय करावे आणि काय नाही असे वाटते.
- पालक, भंडारा