लाखांदूर : यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील तीन सहकारी संस्थांच्या आधारभूत धान खरेदी केंद्रांतर्गत हजारो क़्विंटल धानाची खरेदी करण्यात आली. मात्र आतापर्यंत तालुक्यातील आधारभूत केंद्रांना केवळ १५ उचल आदेश देण्यात आले असून २० हजार क़्विंटल धानाची भरडाईसाठी उचल करण्यात आली. सध्या हजारो क़्विंटल धान गोदामातच पडून आहे. प्रशासनाचे उदासीन धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे.
यंदा खरीप हंगामात तालुक्यातील विजयलक्ष्मी राईस मिल, शेतकी खरेदी-विक्री सहकारी संस्था व पंचशील भात गिरणी सहकारी संस्थेअंतर्गत तालुक्यात १४ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आली होती. या केंद्रांतर्गत तालुक्यात आतापर्यंत जवळपास पाच लाख ७६ हजार क़्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. सदर खरेदी नुसार शासनाने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईसाठी आतापर्यंत केवळ १५ उचल आदेश निर्गमित केल्याची माहिती आहे. त्या आदेशाने २० हजार क़्विंटल धानाची उचल करण्यात आली. धान गोदामातच पडून आहे.
यंदाचा धान खरेदी हंगाम समाप्तीला अवघे काही दिवस उरले आहेत. शासनाने तालुक्यातील आधारभूत धान खरेदी केंद्रांना तातडीने उचल आदेश निर्गमित करण्याची मागणी केली जात आहे.