कोरोनाच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वी नियंत्रण मिळविले. मात्र, गत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. संपूर्ण राज्यासह भंडारा जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढू लागली. १८ एप्रिलपर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम होता. १२ एप्रिलला जिल्ह्यात सर्वाधिक १५९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर १ मार्च रोजी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले होते. ऑक्सिजनसाठीही दमछाक होत होती. अशास्थितीत जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या. त्यात २२ एप्रिलला सर्वाधिक १५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. १९ एप्रिलला रुग्ण बरे होण्याचा दर ६२.५८ टक्के एवढा खाली आला होता. आता तो ९५.३८ टक्क्यांवर गेला आहे. पाॅझिटिव्हीटी रेट ५.३३ झाला आहे.
५४ हजार ९२२ व्यक्तींची कोरोनावर मात
जिल्ह्यात बुधवारी ४०३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आतापर्यंत ५४ हजार ९२२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. बुधवारी ८६ नवे रुग्ण आढळून आले असून त्यात भंडारा २०, मोहाडी ६, तुमसर ११, पवनी ५, लाखनी ६, साकोली २१ आणि लाखांदुर तालुक्यातील १७ जणांचा समावेश आहे. पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आता कोरोना बळींची संख्या १०३५ वर गेली आहे.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह ७५ खाटांचे रुग्णालय उभारले जात आहेत. सनफ्लॅग कारखान्याजवळ ५०० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारले जाणार आहे.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी