लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वेळ सकाळी १० वाजताची. स्थळ संभाजी हॉलसमोर. आरटीओ आणि पोलिसांनी ट्रॅक्टर थांबविला. कारवाईच्या भीतीने चालकाने ट्रॅक्टर भरधाव पळवित भरवस्तीत धुम ठोकली. अनेक घरांच्या सुरक्षा भिंती तोडत हा ट्रॅक्टर वेगाने जात होता. त्याला पकडण्यासाठी आरटीओ आणि पोलिसांचे वाहन त्याच्यामागे धावत होते. तासभर हा थरार भंडारा शहरातील प्रगती कॉलोनी परिसरात सुरू होता. सुदैवाने या भरधाव वाहनांच्या आडवे कुणी आले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.भंडारा शहरातून रेतीची अवैध वाहतूक ही नित्याचीच बाब झाली आहे. पोलीस आणि परिवहन विभागाने याविरूद्ध मोहीम उघडली. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता प्रगती कॉलोनीजवळील संभाजी हॉलसमोर रेती भरलेला विना क्रमांकाचा ट्रॅक्टर थांबविण्यात आला. पोलीस आणि आरटीओ निरीक्षक कारवाई करण्याच्या तयारीत होते. मात्र त्याचवेळी या ट्रॅक्टरचा मालक त्याठिकाणी आला. त्याने चालकाला इशारा केला. क्षणात चालक ट्रॅक्टवर स्वार झाला आणि सेल्फ मारून संभाजी हॉलसमोरून बायपास मार्गे भरधाव निघाला. किसनलाल सभागृहासमोरून दुर्गा माता मंदिर परिसरात या ट्रॅक्टरने अश्विन बांगडकर यांच्या वॉलकंपाऊंडला धडक दिली. भिंत कोसळली. मात्र ट्रॅक्टर थांबायचे नाव घेत नव्हता. त्याच्या मागे पोलीस आणि आरटीओचे वाहन पाठलाग करीत होते.चालकाने आपला ट्रॅक्टर चरणस्मृती नगराकडे वळविला. दरम्यान अनेक घरांच्या सुरक्षा भींतीला धडक देत हा ट्रॅक्टर शुक्रवारी झोपडपट्टीतून एका शेतातील चिखलात जावून फसला. ट्रॅक्टर चिखलात फसल्याचे पाहून चालकाने ट्रॅक्टर तेथेच सोडून पळ काढला. हा थरार तब्बल तासभर प्रगती कॉलोनी, शुक्रवारी, झोपडपट्टी परिसरातील नागरिकांनी अनुभवला.दरम्यान ट्रॅक्टर आणि त्यामागे असलेली वाहने पाहून नागरिक भयभीत झाले होते. या घटनेची तक्रार पोलीस उपनिरीक्षक दिलीप सुटे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून ट्रॅक्टर चालक छोटू गुलाब ठोसरे (३२) रा. जांब कांद्री आणि ट्रॅक्टर मालक गोपाल गणपत देशकर (३६) रा. भगतसिंग वॉर्ड भंडारा यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. या दोघांच्या विरोधात भादंवि २७९ (बेदरकारपणे वाहन चालविणे), ३७९ (चोरी), १८६ (सरकारी कामात अडथडा आणणे), ४२७ (रस्त्यावरील मालमत्तेचे नुकसान करणे), २०१ (पुरावा नष्ट करणे) आणि १०९ (अपप्रेरणा देणे) आदी कलमांसह १८४ (मोटारवाहन कायदा) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक सेलार, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण गाडे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप चुटे, शिपाई दीपक साकुरे यांनी केली.अन्यथा अनर्थ घडला असताभंडारा शहरातून रेतीची अवैध वाहतूक केली जाते. अनेकदा ही वाहने भरधाव असतात. कारवाईच्या भीतीने भरधाव जाणारी रेतीची वाहने नागरिकांच्या हृदयाचा ठोका चुकवितात. शुक्रवारी घडलेल्या या थरार नाट्याने अनेकांची पाचावरधारण बसली होती. सुदैवाने या भरधाव ट्रॅक्टरच्या समोर कुणी आले नाही अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.
अवैध रेती ट्रॅक्टरचा शहरात थरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 10:43 PM
वेळ सकाळी १० वाजताची. स्थळ संभाजी हॉलसमोर. आरटीओ आणि पोलिसांनी ट्रॅक्टर थांबविला. कारवाईच्या भीतीने चालकाने ट्रॅक्टर भरधाव पळवित भरवस्तीत धुम ठोकली.
ठळक मुद्देपोलीस आणि आरटीओंनी केला सिनेस्टाईल पाठलाग : अनेक घरांच्या सुरक्षाभिंती तोडल्या, नागरिकांत भीतीचे वातावरण