भंडारा जिल्ह्यात काेराेनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात आहे. गत महिन्यात तर भंडारा काेराेनामुक्त झाला हाेता. राज्यातील पहिला काेराेनामुक्त जिल्हा हाेण्याचा मानही मिळाला हाेता. सध्या ही स्थिती नियंत्रणात आहे. मात्र सरासरी आठ दिवसांत एक रुग्ण आढळून येत आहे. शुक्रवारी ७०९ व्यक्तींची तपासणी केल्यानंतर केवळ लाखनी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ६० हजार ९३ व्यक्तींना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यापैकी ५८ हजार ९५८ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली. जिल्ह्यात ११३३ व्यक्तींचा काेराेनामुळे मृत्यू झाला आहे.
काेराेना संसर्गाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे लसीकरण माेहीम राबविली जात आहे. जिल्ह्यात पहिला व दुसरा डाेस घेणाऱ्यांची संख्या १० लाखांच्या पार गेली आहे.