पालांदूर : चुलबंद खोऱ्यात मऱ्हेगाव जुना ते मऱ्हेगाव नवीन हा तीन किलोमीटरचा रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेलेला आहे. साधे पायी चालणे कठीण झालेले आहे. शालेय विद्यार्थ्यांसह शेतकरी वर्गाला याच मार्गाने अवागमन करावे लागत असल्याने रहदारीची समस्या कायम आहे.
सदर रस्ता दहा वर्षापूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता. त्यानंतर गत वर्षाला तात्पुरत्या स्वरूपात लाख रुपयांच्या घरात डागडुजी करण्यात आली होती. मात्र या रस्त्याची जमीन ही फाटणारी असल्याने जमिनीला पर्यायाने रस्त्याला भेगा जातात. त्यामुळे सदरचा रस्ता मोठ्या दगडाच्या आधाराने बनविणे नितांत आवश्यक आहे. चुलबंद खोऱ्यात दोन नदी घाटांचा समावेश आहे. वाकल व मऱ्हेगाव इथून रेतीचे मोठे ट्रक धावतात. त्यामुळे सुद्धा अवजड वाहतुकीने रस्त्याची दुर्दशा झालेली आहे. दरवर्षी रेतीघाट लिलावात निघत असल्याने या रस्त्यावरून वाहतूक सुमार असते. ट्रकच्या दणक्यात संपूर्ण रस्त्याची ऐशी की तैशी होते. पावसाळ्यात या रस्त्यातून शेतकरी वर्गासह शाळकरी मुलांना प्रवास करावा लागतो. या दिवसात तारेवरची कसरत करीत प्रवास करावा लागतो.
गत चार पाच वर्षापासून या रस्त्यावर उत्तम बांधकाम व्हावे, याकरिता माजी सरपंच श्यामाजी बेंदवार, विलास शेंडे, पुरुषोत्तम दुरुगकर, डॉ. आसाराम शिवणकर ढिवरखेडा, असरानी बहेकार, बाळकृष्ण दुरुगकर, आदींनी बांधकाम विभागाकडे मागणी केली होती. त्याची दखल घेत गत वर्षाला तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली. परंतु वाहतूक मोठी असल्याने व जमीन खराब असल्याने रस्त्याची संपूर्णतः वाट लागलेली आहे.
प्राथमिक शाळा नवीन मऱ्हेगावला असल्याने जुन्या गावची मुलं याच मार्गाने जातात. अशा कठीण खडतर मार्गावरून या बच्चेकंपनीला प्रवास करताना खूप त्रास सहन करावा लागतो.
सदरचा रस्ता तीन किलोमीटर पर्यंत चा संपूर्णतः खचलेला आहे. हा रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून करण्यात आला असल्याने त्याचे काम पुन्हा त्याच योजनेतून नियोजित आहे. पंतप्रधान ग्रामसडक योजनेत पालांदूर ते वाकल, निमगाव- जेवनाळा ते केसलवाडा (पवार) व मऱ्हेगाव जुना ते मऱ्हेगाव नवीन असे या योजनेतून कामाचे नियोजन केल्याचे समजले. पावसाळ्यापूर्वी हा नियोजित रस्ता झाल्यास गावकरी वर्गांना पावसाळ्याच्या दिवसात रहदारीकरिता मोठी सुविधा उपलब्ध होईल.
- देवकन बेंदवार, सरपंच, मऱ्हेगाव.