तुमसर (भंडारा) : रस्त्याच्या कडेला कार उभी करून मित्रासोबत नाश्ता करायला गेलेल्या व्यावसायिकाच्या कारची काच फोडून दोन लाख ७५ हजार रुपये भरदिवसा लंपास करण्याची घटना तुमसर येथील श्रीराम भवनासमोर मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. काहीवेळापूर्वी एका व्यापाऱ्याला देण्यासाठी ही रक्कम बँकेतून काढली होती.
रोहन बालपांडे (२१, रा. देव्हाडी ता. तुमसर) असे पैसे चोरीस गेलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते मंगळवारी कारने (क्र. एमएच ३४ - ७९४०) तुमसर येथे आले. एका व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी त्यांनी सकाळी ११.३० वाजता बँकेतून ८५ हजार रोख काढले. त्यांच्याकडे असलेले एक लाख ९० हजार आणि बँकेतून काढलेले असे दोन लाख ७५ हजार रुपये त्यांनी कारमध्ये ठेवले. मित्र मुकेश मलेवार यांच्या सोबत नाश्ता करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनी आपली कार श्रीराम भवन इमारतीजवळ लॉक करून उभी ठेवली. नाश्ता करून परत आले. तेव्हा त्यांना कारची काच फोडलेली दिसली. कारमध्ये बघितले तर पैसे लंपास झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
या घटनेची तक्रार तुमसर ठाण्यात देण्यात आली. एका कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन ते तीन चोरटे कार जवळ उभे दिसत असून त्यांनी रक्कम लंपास केल्याचा संशय आहे. चोरट्याने घातलेला पोशाख व त्यांची देहबोली भंडारा व अमरावती येथे झालेल्या चोरी प्रकरणातील चोरट्यांशी साम्य दिसते. पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरू असून ही चोरट्यांची टोळी विदर्भामध्ये चारचाकी वाहनातून चोरी करीत असल्याचे समजते.