लोकमत शुभवर्तमान : वरठीतील २५ युवक करतात मंदिरात अभ्यासवरठी : मंदिरात जाऊन देवाला नोकरीकरीता साकडे घालणारे युवक - युवतीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. देवाला नुसते साकडे न घालता मंदिरात राहुन सेवा करणे आणि उर्वरीत वेळाचे नियोजन करून अभ्यास करणारे युवक - युवती सापडत नाही. परंतु वरठी येथील काही युवकांनी मंदिरात राहुन नोकरीचे शिखर गाठले. त्यापैकी आणखी काही युवक नोकरीवर लागण्याच्या तयारीत आहेत. हनुमान वॉर्डातील हनुमान मंदिरात २० ते २५ युवकांची फौज मुक्कामी राहते. त्यापैकी तिघांना नोकरी लागली. जिद्द व प्रामाणिक प्रयत्न केले तर यश नक्की मिळते हे या युवकांनी दाखवून दिले.आपल्याकडे प्रशस्त व आकर्षक देवालयाच्या वास्तु मोठ्या प्रमाणात आहेत. गावागावात उभारलेले देखणे मंदिर आणि त्या मंदिरात सकाळ-संध्याकाळ पुजा करणाऱ्या भाविकांची दिनचर्या सुरु राहते. या मंदिरातून युवकानी अभ्यास करून यश गाठल्याचे उदाहरण सापडत नाही. पण वरठी येथील निखील बोंदरे या युवकाला वॉर्डातील घरोघरी जावून सुशिक्षित युवकांना एकत्रित करून मंदिरातच अभ्यास केंद्र सुरु केले. अवघ्या चार महिन्यात तिन युवकांना भारतीय सैन्यदलात नोकरी लागली. यासाठी मंदिर व्यवस्थापन समिती आणि सामाजिक कार्यकर्त्यानी हातभार लावला. युवक नोकरीला लागल्यामुळे त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थक ठरला. वरठी येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे. या मंदिरात विविध धार्मिक व सास्कृंतिक कार्यक्रमात योगदान असून १०० वर्षापासून गावात सुरू असलेला पोळा सण थाटात साजरा होतो. दरवर्षी गणेश उत्सव आणि भागवत सप्ताह यासह जेष्ठ नागरीकांचे सर्व कार्यक्रम येथे साजरे होतात. मंदिराची वास्तु खुप जीर्ण झाली होती. सामाजिक कार्यकर्ते घनशाम बोंदरे यांनी पुढाकार घेऊन मदिराचे सौदर्यीकरण आणि जिर्णोद्धार केले. उपसरपंच मिलींद रामटेके यांच्या पुढाकाराने त्या युवकानी मंदिराचा उपयोग अभ्यास केंद्र म्हणून केला.मंदिरात राहुन अभ्यास करणे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणरे हे युवक शिक्षित नाहीत. २० ते २५ जणाच्या या ग्रृपमध्ये १२ वी, आय.टी. आय झालेले युवक आहेत. यापैकी अनेकजण शिक्षण घेत आहेत. मोजक्याच विद्यार्थ्यानी पदवीचे शिक्षण घेतले. आपल्याकडे उच्च शिक्षिताची फौज पडून आहे. प्रयत्नाअभावी गावातच फिरताना दिसतात. या युवकानी प्रयत्नाची पराकाष्ठा करून शालेय शिक्षण आणि नोकरी - रोजगाराकरीता प्रयत्न सुरु ठेवले. प्रयत्न केल्यास शिक्षण किंवा आर्थिक परिस्थिती आड येत नाही हे दाखवून दिले. शिक्षणानुसार प्रयत्न आणि त्यासाठी घेतलेली मेहनत त्यांच्या यशाची जमेची बाजू आहे.जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या सैन्य भरती च्या वेळी वरठी येथील अश्विन ठवकर, रजत पाटील व अनिल मते यांनी सहभाग घेतला होता. यात तिघाचीही निवड झाली. अश्विन चे वडील नाही. आई मोल मजुरी करून कुंटुब चालवते. रजत च्या घरची परिस्थिती साधारण आहे. अनिल चे आई - वडील शेतमुजुरी करतात. तिघाचे शिक्षण १२ वी पर्यत झाले असून अश्विनने आय.टी.आय. केले आहे. चार महिण्यापासून ते मंदिरात राहतात. जेवायला आणि आंघोळीला घरी जातात. उर्वरीत सर्व वेळ अभ्यास आणि व्यायामाला देतात.या अभ्यास केंद्रात राकेश मोरे, प्रतीक कमाने, कार्तिक नंदुरकर, पराग पाटील, रोशन मोरे, पवन बोंदरे, अविनाश शेंडे, गुलशन भुजाडे, रोहीत मीरासे, आशिष केरेकर, सुजीत सव्वालाखे, दद्दु ठाकरे, पींटु सेलोकर, सोनु जगनाडे, श्रीकृष्ण हींगे, निलेश झंझाड, अमन बोंदरे, दिनेश कुकडे, वासु बोंदरे, सचिन तांबेकर, अमिष डाकरे, सागर मोहतुरे, सुमीन गावडे, नितेश कहालकर अभ्यास करतात.सर्व युवक मंदिरात राहतात. समाज मंदिरातील एका खोलीत त्यांनी वाचनालय तयार केले आहे. वाचनालयाकरिता प्रत्येकाने घरचे पुस्तके आणून ठेवले आहे. २४ तासाचे अभ्यासाचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. (वार्ताहर)
मंदिरात अभ्यास करून तिघांनी मिळविली नोकरी
By admin | Published: March 20, 2016 12:32 AM