वाळूघाट बंद करा : लाखांदूर तालुक्यातील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील परसोडी ते मोहरणा या मागार्ची मागील चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. लाखांदूरमार्गे टेंभरी, गवराळा या मार्गावरील वाळूघाटाचे लिलाव झाल्यामुळे संबंधित रस्त्याचे तीनतेरा वाजले आहे. तालुक्याचे हे ठिकाण १५ ते १७ कि. मी. अंतरावर असून मोहरणा जिल्हा परिषदेतील कुडेगाव व मोहरणा या दोन बसेस येतात. या भागात बारा गावे येतात. या मार्गावरून गावातील नागरिक ये-जा करीत असतात. या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. इटान वाळूघाट चालू असल्याने या भागातील रस्त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. तर आणखी मोहरणा वाळूघाटाला हिरवी झेंडी मिळाल्याने चार महिने हा वाळूघाट सुरू राहणार असल्याचे वाळू ठेकेदाराकडून सांगण्यात आले. पाऊस लागल्यानंतर रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट असते. रस्त्याची क्षमता नसतानाही वाळू घाटाच्या लिलावामुळे जड वाहतूक होत असल्याने जागोजागी खड्डे पडलेले आहेत. मागील काही वर्षांपासून लाखांदूर, परसोडी ते मोहरणा बससेवा बंद पडली. परिणामी अजूनही रस्त्याच्या अभावामुळे बससेवा सुरू होऊ शकली नाही. या भागातील शाळकरी मुलामुलींना पादचारीच रस्त्याने २ ते ७ कि.मी. अंतराचा पल्ला गाठावा लागतो. परंतु वाळूघाट लिलामुळे रस्त्यांची परिस्थिती बिकट होत आहे. परिणामी मोठे वाहन समोरून आल्यास दुचाकीस्वारांना रस्त्याच्या खाली उतरावे लागते. कधी ट्रकचालक अरेरावी करतात. या घाटामुळे लाखोंचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होत असला तरी रस्त्याकडे मात्र शासनाकडून लक्ष दिले जात नाही. या मार्गावर अनेक अपघात झाल्याच्या घटना आहेत. या उन्हाळ्यात रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात या रस्त्यांनी प्रवास करणे कठीण होणार आहे. मागील चार वर्षांपासून अनेक निवेदन जिल्हाधिकारी व संबंधित कार्यालयाकडे देण्यात आले. मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या गेली नाही.
जड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीनतेरा
By admin | Published: May 27, 2017 12:25 AM