लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अनिश्चिततेच्या सावटात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने बुधवारपासून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील ३९ गटांमध्ये सध्यातरी तिरंगी-चाैरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी अपक्षांचा जाेर दिसत असून यामुळे पक्षाच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असली तरी निवडणूका पुढे जाणार तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित हाेत आहे.जिल्हा परिषदेच्या ५२ गटांची निवडणूक घाेषित झाली. मात्र, ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्याने १३ गटांतील निवडणुकीला स्थगिती मिळाली. आता ३९ गटांतील निवडणूक हाेत आहे. मंगळवारपासून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु सर्वाेच्च न्यायालयात काय निकाल लागताे याकडे लक्ष लागले हाेते. अखेर बुधवारी निवडणूका हाेणार हे निश्चित झाले आणि सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत. भंडारा तालुक्यातील नऊ गटांत निवडणूक होत असून गणेशपूर, खोकरल, धारगाव, आमगाव, ठाणा याठिकाणी चौरंगी तर इतर ठिकाणी तिरंगी लढत होत आहे. सर्वांचे लक्ष गणेशपूरच्या निवडणुकीकडे लागले आहे. तुमसर तालुक्यातील चिखला व आंबागड येथे चाैरंगी तर आष्टी बपेरा येरली खापा, देव्हाडी येथे तिरंगी लढत हाेत आहे. माेहाडी तालुक्यातील चारही गटामध्ये तिरंगी लढतीची शक्यता आहे. आंधळगाव पाचगांव, बेटाळा आणि करडी येथे रणधुमाळी सुरू आहे. बेटाळा क्षेत्रात अपक्षाने जाेर वाढविला आहे. साकाेली तालुक्यातील सहा गटांत निवडणूक हाेत असून पिंडकेपार, कुंभली, परसाेडी, वडद येथे चाैरंगी तर किन्ही, सानगडी गटात तिरंगी लढत हाेत आहे. वडद, कुंभली आणि पिंडकेपार येथे माेठ्या प्रमाणात अपक्ष रिंगणात आहेत.लाखनी तालुक्यातील केवळ दाेन गटांत निवडणूक हाेत असल्याने येथे उत्साह दिसत नाही. पाेहरा आणि लाखांदूर येथे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. परंतु पुढे जाण्याची प्रतीक्षा सुरू आहे. पवनी तालुक्यातील अड्याळ पिंपळगाव, काेंढा, आसगाव आणि सावरला येथे तिरंगी लढतीची शक्यता असून कुठेही सरळ लढत हाेणार नाही. लाखांदूर तालुक्यात मासळ, दिघाेरी, भागडी, सरांडी, माेहरणा, पिंपळगाव येथे निवडणूक हाेत असून सर्वच ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. विविध पक्षात बंडखाेरी झाली असून, १२ अपक्ष उमेदवार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचे गणित बिघडवू शकते.
प्रचाराला सुरुवात, अन् उमेदवारांची घालमेल- ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर निवडणूक हाेणार की नाही याबाबतची अनिश्चितता गुरुवारी सायंकाळपर्यंत कायम हाेती. राज्य मंत्रीमंडळात निवडणूका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु दिवसभरात राज्य निवडणूक आयाेगाकडून काेणताही आदेश काढण्यात आला नाही. उमेदवारांनी दिवसभर प्रचार केला. परंतु निवडणूक स्थगित तर हाेणार नाही ना? अशी शंकाही त्यांना सतावत हाेती. प्रत्येकजण निवडणूक आयाेगाच्या निर्णयाकडे लक्ष ठेवून हाेते. दाेन दिवसांपासून प्रचाराला सुरुवात झाली असली तरी उमेदवार प्रचार करताना सावध पवित्रा घेत असल्याचे दिसत आहे. ऐनवेळी निवडणूक रद्द झाली तर आपल्याला आर्थिक फटका बसू नये अशी त्यांची भूमिका आहे. एकीकडे प्रचारतर करावा लागत आहे. परंतु निवडणूक रद्द झाली तर काय अशी अनिश्चितताही सतावत आहे.
ओबीसींच्या भूमिकेकडे उमेदवारांचे लक्ष- निवडणूक झाली आणि आपल्या गटातील ओबीसी समाजाने निवडणूकीवर बहिष्कार टाकला तर काय? अशी शंकाही उमेदवारांना सतावत आहे. ओबीसी संघटनानी आरक्षण नाही तर मतदान नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे उमेदवार संभ्रमात सापडले आहे. भंडारा जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज असून निवडणूकीत भाग घेतला नाही तर माेठा प्रभाव या निवडणूकीवर पडू शकताे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लागले आहे.