तुमसर न्यायालयाचा निर्णय : खंडणी तथा धमकावल्याचे प्रकरणतुमसर : एका व्यावसायिकाला धमकी देऊन खंडणी वसुल केल्याप्रकरणी तुमसरातील तीन सराईत आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाचा कठोर कारावास आणि नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. के. उमाळे यांनी हा निकाल दिला.तुमसर पोलीस ठाण्यातंर्गत एप्रिल २०१४ मध्ये गंज बाजार परिसरात आशिष निखाडे रा.तुमसर यांच्या आॅनलाईन लॉटरी दुकानात आरोपी संतोष ऊर्फ गोलु सुभाष गभने आणि धीरज ऊर्फ शेरु वसंता पडोळे रा. माकडे वॉर्ड तुमसर आले. आरोपी संतोषने आशिष निखाडे यांना चाकुचा धाक दाखवून एक हजाराची मागणी केली. आशिषने मी दुकान आताच सुरु केल्यामुळे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा आरोपी संतोषने मी पुन्हा सहा तारखेला येईन तेव्हा मला पाच हजार देशील नाही तर ‘तेरा काम कर दुंगा’ असे धमकावून आरोपी निघून गेले. त्यापूर्वीही या आरोपींनी आशिषला अनेकदा धमकावून खंडणी वसुल केली होती.३ एप्रिल २०१४ ला तोंडी तक्रारीवरुन आरोपीविरुध्द भादंवि ३८४, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात विरेंद्र ऊर्फ विरु रमेश फुले (३४) रा.दत्तात्रय नगर तुमसर, संतोष गभणे (२४), धीरज पडोळे (३२) रा.माकडे वॉर्ड तुमसर यांना अटक करण्यात आली. सबळ पुराव्यानंतर त्यांच्याविरुध्द भादंवि ३८४, ३८६, ३८७, ३४ सहकलम २०१ अन्वये तुमसर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. या तिन्ही आरोपीविरूद्ध प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी व्ही. के. उमाळे यांच्या न्यायालयाने तिन्ही आरोपींना प्रत्येकी तीन वर्षाचा कठोर कारावास आणि प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. हे तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, खुन, खूनाचा प्रयत्न गैरकायद्याची मंडळी, दुखापत, गंभीर दुखापत, भारतीय हत्यार कायदा अन्वये अपराध, मारामारी, अश्लिल शिवीगाळ, धमकदी देणे असे अनेक गुन्हे दाखल आहेत.या खटल्याचे काम सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील अॅड. मनिषा राऊत यांनी पाहिले. गुन्ह्याचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे आणि पोलीस निरीक्षक किशोर गवई यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. एम. जाधव तथा सहकाऱ्यांनी केला. (तालुका प्रतिनिधी)
आरोपींना तीन वर्षांचा कारावास
By admin | Published: December 04, 2015 12:49 AM