तुमसर : तालुक्यातील पौनारखारी येथे डिपीडीसी अंतर्गत अंगणवाडी इमारतीचे तीन वर्षापूर्वी ग्रामपंचायती मार्फत बांधकाम करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी निवडणुकीनंतर बदलली. परंतु अजूनपर्यंत इमारतीचे अंतीम देयक अडले आहे. त्यामुळे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.जिल्हा परिषदेच्या डीपीडीसी विभागाच्या जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तालुक्यातल्या आदिवासी बहुल पौनारखारी येथे सन २०११-२०१२ मध्ये नऊ महिन्याच्या मुदतीत आंगणवाडी इमारतीचे संपूर्ण बांधकाम करण्यात आले. इमारत ही ४ लाख ५० हजार रुपये किमतीची होती. सदर बांधकामाची एजन्सी म्हणून ग्रामपंचायतने कार्य केले. त्यावेळी डी.पी.डी.सी. विभागाने सदर कामाचे ३ लाख ३ हजार २६५ रुपयाचे धावते देयक ग्राम पौनारखारीला दिले होते. आता पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपून तीन वर्षाचा कालावधीही लोटला. परंतु सदर बांधकामाचे १ लाख ४६ हजार ७३५ रुपयांचे अंतिम देयक अजूनही अडलेच आहेत. त्यामुळे पौनारखारी येथील विकास कामे ठप्प पडली आहेत. एकीकडे शासनाने घरकर आदी घेण्यास मज्जाव केल्याने सामान्य फंडात ठणठणाट आहे. गावातील नाली सफाई, ब्लिचिंग पावडर, दिवाबत्ती आदी सुविधा पुरवू शकण्यात असमर्थता आहे. नव्याने निवडनू आलेल्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम देयक द्यावे अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. (शहर प्रतिनिधी)
तीन वर्षे लोटूनही अंगणवाडी बांधकामाचे देयक अप्राप्त
By admin | Published: October 12, 2015 1:13 AM