भंडारा : पवनी शहरात मंगळवारी सकाळी रेतीची वाहतूक करणाऱ्या टिप्परने अक्षरश: थरार केला. एका दुचाकीस्वाराला धडक देऊन पळ काढला. पुढे एका ट्रॅक्टरला धडक दिली. हा अपघातग्रस्त ट्रॅक्टर तीन दुचाकींचा चुराडा करीत थेट चहाच्या दुकानात शिरला. दुचाकीचालकाच्या पायाचे हाड मोडले तर चहा दुकानदारासह दोघे जखमी झाले. सकाळी ८:१० वाजताच्या सुमारास हा थरार घडला.
पवनी-निलज महामार्गावर हा अपघाताचा थरार अनुभवास आला. रेती रिकामी करून पुन्हा दुसऱ्या खेपेसाठी भिवापूरकडून पवनीकडे वेगात येणाऱ्या टिप्परने (क्रमांक एमएच २७ एक्स ७६१०) नागपूर सावजी भोजनालायसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. समोरासमोर बसलेल्या या धडकेमुळे चालकासह दुचाकी अक्षरश: हवेत उडून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जावून पडली. यात दुचाकीस्वाराच्या पायाचे हाड मोडून गंभीर दुखापत झाली. जखमी दुचाकी चालकाचे नाव लोमेश्वर श्रीराम ठाकरे (५०, भिवापूर) असून दुचाकी क्रमांक एमएच ४० बीएच ४२६२ असा आहे.
पळ काढताना दुसरा अपघातया अपघातानंतर टिप्परचालकाने पळ काढला. वेगात पुढे जात असताना पुन्हा पवनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुसरा अपघात केला. मधू कुर्झेकर यांच्या चहाच्या दुकानापुढे बेलघाटा वॉर्डातून येणाऱ्या ट्रॅक्टरला जबर धडक दिली. यात ट्रॅक्टरचे पुढील चाकच तुटून पडले. या ट्रॅक्टरमुळे पुन्हा दोन अपघात घडले. पोलिसांनी टिप्परचालक पवन नेवारे (२५) याला टिप्परसह ताब्यात घेतले असून दुचाकीचालक जखमी लोमेश्वर ठाकरे याला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तीन दुचाकींचा चुराडाटिप्परच्या धडकेमुळे चाक तुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रॅक्टर थेट तीन दुचाकींचा धडक देत चहाच्या दुकानात शिरला. यात एमएच ३६ एएच ३०९२, एमएच ३४ एएल १०६८ आणि एमएच ३६ एके ५२२२ या तीन दुचाकींचा अक्षरश: चुराडा झाला. एवढेच नाही तर, चहा दुकानदार मधुकर (६०) आणि दुकानात चहा घेत असलेला ग्राहक रमेश उराडे (५०) हे दोघेही किरकोळ जखमी झाले.अवैध रेती तस्करी कारणीभूततालुक्यात रेतीचोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. रोज शंभरावर टिप्पर रेतीची चोरटी वाहतूक करतात. ही तस्करी निरपराध नागिरकांच्या जीवावर उठत असल्याने आता महसूल विभागातील अधिकारी आणि पोलिसांविरूद्ध संताप व्यक्त होत आहे.