भंडारा : नाकाडोंगरी येथील न्यूड डान्स प्रकरण ताजे असताना पुन्हा वरठी पोलिस स्टेशनच्या हद्दीत बीड (सीतेपार) या गावात आयोजित केलेल्या तमाशा व लावणीच्या कार्यक्रमात नृत्यांगनांवर नोटांची उधळण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
वरठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे दाखल केलेल्यांमध्ये फिरोज संजय गजभिये, विकी जयदेव गायधने, आशिष देशकर, दुर्योधन बावनकुळे, विकी जीभकाटे, रितेश वासनिक आणि कारेमोरे अशा सात जणांचा समावेश आहे. बीड सीतेपार या गावामध्ये कलम १४९ नुसार नोटीस बजावल्यानंतरदेखील या नोटीसचे उल्लंघन करून कसलीही परवानगी न घेता गावात मंडई कार्यक्रमांमध्ये तमाशा व लावणीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या लावणीमध्ये नृत्यांगनाही होत्या. त्यांच्या नृत्यादरम्यान नोटांची उधळण करून असभ्य वर्तन केल्याचा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास झाला. या प्रकरणी पोलिस शिपाई नीलेश चौधरी यांच्या लेखी तक्रारीवरून कलम १८८, २९४, ५०६ भादंवि सह कलम ११०, ११२, ११७ महाराष्ट्र पोलिस कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.