पालांदूर (भंडारा) : लाखनी तालुक्यातील वाकल व मऱ्हेगाव येथे बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळाने १०० घरांची पडझड झाली. अनेक वृक्ष उन्मळून पडली असून मऱ्हेगाव येथील हनुमान मंदिरावर वीज ही कोसळली. यात दोनजण किरकोळ जखमी झाले.
रुकमा सुखदेव केवट (५५) व प्रज्वल मारुती चंदन बावणे (१८) रा. वाकल ता. लाखनी असे जखमींची नावे आहेत. बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जोरदार वादळ झाले. अवघ्या पाच मिनिटांच्या या वादळाने दोन्ही गावात मोठे नुकसान केले. वाकल येथे सुमारे ७० घरांचे तर मऱ्हेगाव (जुना) येथे ३० घरांचे नुकसान झाले. अनेक वृक्ष उन्मळून पडली. तर वीज खांबही वाकले आहेत.
धो-धो बरसला पाऊस;25 मंडळात अतिवृष्टी
दोन्ही गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तलाठी सुनील कासराळे यांनी तत्काळ घटनास्थळावर भेट देऊन तालुका व जिल्हा प्रशासनाला माहिती दिली. मऱ्हेगाव जुना येथे हनुमान मंदिराच्या कळसावर वीज कोसळली. त्यात गाभाऱ्याचे नुकसान झाले.
दरम्यान, जिल्ह्यात मंगळवारी रात्री धो-धो पाऊस बरसल्याने २५ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे. भंडारा-बालाघाट राष्ट्रीय महामार्ग आणि भंडारा-तुमसर राज्यमार्ग ठप्प झाला आहे. गत २४ तासात जिल्ह्यात तब्बल ९५.८ मिमी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत सरासरीच्या ११२ टक्के पाऊस कोसळला आहे. या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.