आॅनलाईन लोकमतगोबरवाही/तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी गावालगत असलेल्या रेल्वेच्या जुन्या सदनिका परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाघ दिसून आला. ही वार्ता गावात पसरताच वाघाला बघण्यासाठी ग्रामस्थांनी एकच गर्दी केली. याची माहिती होताच वनविभागाचे पथक व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे हा वाघ गावातूनच जंगलाच्या दिशेने निघून गेला.मध्यप्रदेश-महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती भागात तीन ते चार वाघ आहेत. हे वाघ तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त परिसरात आले आहेत. पवनारखारी, सुंदरटोला, धनेगाव, चांदपूर व सीतासावंगीत या वाघाला अनेकांनी पाहिले आहे. परंतु हा वाघ नेमका कोणता? हे सांगता येणार नसल्याचे वनविभागाच्या कर्मचाºयांनी सांगितले.तुमसर तालुक्यातील या जंगलव्याप्त परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. या परिसरात वाघांची भटकंती सुरू असून जंगलव्याप्त परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघांचे नागरिकांना दररोज दर्शन होत आहे. यापूर्वी वाघांच्या हल्ल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. वनविभागाने याठिकाणी पिंजरा लावण्याची गरज आहे. वाघ दिसल्यावर वनविभागाचे अधिकारी ताफ्यासह येतात परंतु ठोस उपाययोजना करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सीतासावंगी येथे वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी, एस.यु. मडावी यांच्यासह वनविभागाचा ताफा हजर होता.भेदरलेला वाघ अन् बघ्यांची गर्दीनागरिकांच्या गर्दीमुळे हा वाघ ५० मीटर अंतरातच दोन ते अडीच तास फिरत होता. एकीकडे वाघ आणि दुसरीकडे गर्दी असे चित्र होते. लोकांची गर्दी आणि ओरडण्याच्या आवाजाने हा वाघ भेदरलेला होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सीतासावंगी येथील वाघाने चिखला परिसरातील जंगलात आश्रय घेतला आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालीवर आमची नजर आहे.- अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.
वाघोबाचे गावातूनच जंगलात पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:04 AM
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या सीतासावंगी गावालगत असलेल्या रेल्वेच्या जुन्या सदनिका परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास ग्रामस्थांना वाघ दिसून आला.
ठळक मुद्देसीतासावंगीत वाघाचा ठिय्या : चार तासानंतर चिखला जंगलात मार्गक्रमण