बेला - कोरंभी रस्त्यावर वाघाच्या पावलांचे ठसे मंगळवारी सकाळी काही ग्रामस्थांना दिसून आले. ही बाब आदर्श युवा मंडळाचे अध्यक्ष पवन मस्के यांना सांगितली. त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांच्यासह वन विभागाचे इर्शाद सैय्यद, अनिल डांगे, भेंडारकर यांनी घटनास्थळ गाठले. वाघाच्या पावलांच्या ठशांची खात्री करण्यात आली. या परिसरात ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असून, पावसामुळे पावलांचे ठसे वाघाचे आहेत की, बिबट्याचे यांचा अद्याप अंदाज आला नाही. मोठ्या बिबट्याच्या पावलाचे ठसेही वाघासारखे दिसतात. त्यामुळे हा वाघ, की बिबट्या हे ट्रॅप कॅमेऱ्यातूनच समजेल, असे वन परिक्षेत्र अधिकारी विवेक राजुरकर यांनी सांगितले. बेला, पिंडकेपार, कोरंभी, दवडीपार परिसरातील नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले. सायंकाळी ५ वाजल्यानंतर कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन पवन मस्के यांनी केली. यावेळी गावकरी हरेश्वर तिरमारे, वासुदेव कातोरे, अनिकेत बघेले, राजू गोस्वामी, तुषार निंबार्ते आदी उपस्थित होते.
बेला-कोरंभी रस्त्यावर आढळले वाघाचे पगमार्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:36 AM