भंडारा : शहरालगतच्या गणेशपूर, पिंडकेपार शिवारात वाघाचे पगमार्क शनिवारी आढळल्याने एकच खळबळ उडाली. वनविभागासह गणेशपूरच्या नागरिकांनी दिवसभर शोधमोहीम राबविली. मात्र, वाघाचा पत्ता लागला नाही. दरम्यान सायंकाळी ७ वाजता गणेशपूर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ वाघ दिसल्याचा दावा काही जणांनी केला.
गणेशपूर शिवारातील साठवणे यांच्या शेतात तयार केलेल्या गादीवाफ्यात शनिवारी सकाळी वाघाच्या पायाचे ठसे आढळून आले. त्यांनी ही माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे आणि सरपंच मनीष गणवीर यांना दिली. तसेच वनविभागालाही ही माहिती देण्यात आली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत परिसरात शोधमोहीम सुरू झाली. तेव्हा गणेशपूर स्मशानभूमीपासून ते वैनगंगा नदीच्या तिराने पिंडकेपारपर्यंत वाघाचे ठसे आढळून आले. वाघ मोठा असल्याचे पगमार्कवरून दिसून येते. वनविभागाच्या रॅपिड ॲक्शन टीमने संपूर्ण परिसर पिंजून काढला; परंतु वाघाचे कुठेही दर्शन झाले नाही. मात्र, सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गणेशपूर पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीजवळ वाघ दिसल्याचा दावा मासेमारांनी केला. शोध मोहिमेत यशवंत सोनकुसरे, मनीष गणवीर, मयूर भुरे, शेखर खराबे, बंडू चेटुले यांच्यासह २५ ते ३० तरुण सहभागी झाले होते. जवळपास १ किलोमीटरपर्यंत पगमार्क शोधण्यात आले. सायंकाळी ४.४० वाजता उपवनसंरक्षक शिवराम भलावी यांनी या परिसराची पाहणी केली. तसेच रॅपिड ॲक्शन पथकाला परिसरात गस्त घालण्याचे निर्देश दिले. वाघाचे पगमार्क दिसल्याची माहिती परिसरात होताच एकच खळबळ उडाली. हा वाघ कोका अभयारण्यातून आला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. रात्रभर गस्त घातली जाणार असल्याचे वनविभागाने सांगितले.
गणेशपूर, पिंडकेपार शिवारात वाघाचे पगमार्क आढळले. पगमार्कवरून हा वाघ मोठा असावा असे दिसते. वनविभाग शोधमोहीम राबवीत असून जवाहरनगर, कोरंभी, कवडसीपर्यंत शोधमोहीम घेतली जाणार आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना दिली.
-शिवराम भलावी, उपवनसंरक्षक, भंडारा