लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तुमसर तालुक्यातील लेंडेझरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बपेरा आंबागड गावशिवारातील बावनथडी वितरिकेत गुरुवारी सायंकाळी मृतावस्थेत आढळलेल्या वाघाची शिकारच झाल्याची बाब समाेर आली आहे. एकीकडे प्रशासन स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर जखमी झाल्याचे सांगत असले तरी वैद्यकीय तज्ज्ञांनी या वाघाची सापळा रचून शिकार केल्याचे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. दि. ३१ मार्च राेजी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास बावनथडी वितरिकेत अंदाजे दाेनवर्षीय नर वाघ मृतावस्थेत आढळला. सायंकाळ झाल्याने शुक्रवारी सकाळी शवविच्छेदन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या प्रमाणभूत कार्यपद्धतीनुसार करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार चिचाेली येथील शासकीय आगारात वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. याप्रसंगी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव नागपूर) यांचे प्रतिनिधी तथा मानद वन्यजीवरक्षक नदीम खान राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी शाहीद खान, साकाेलीचे पशुधन विकास अधिकारी डाॅ. गुणवंत भडके, डाॅ. विठ्ठल हटवार, डाॅ. पंकज कापगते, डाॅ. जितेंद्र गाेस्वामी, डाॅ. एस. सी. टेकाम, भंडाराचे उपवनसंरक्षक राहुल गवई, विभागीय वनअधिकारी (दक्षता) प्रीतमसिंग काेडापे, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, सहायक वनसंरक्षक यशवंत नागुलवार, नाकाडाेंगरीचे वनपरिक्षेत्राधिकारी, मनाेज माेहिते, फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्राधिकारी संजय मेंढे उपस्थित हाेते. पंचांसमक्ष बाह्यतपासणी व शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या. वाघाच्या जबड्यातील खालील एक सुळा अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आढळला. तसेच समाेरचा उजवा पाय सांध्यामधून निखळलेल्या अवस्थेत व डाव्या पायाचा पंजा जखमी हाेता.वाघाच्या चारीही पायांची नखे घासल्यामुळे झिजलेल्या अवस्थेत आढळल्याचे वनप्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच उर्वरित अवयव शाबूत असल्याचे सांगण्यात आले.वाघाचा ज्या ठिकाणी मृत्यू झाला, ते क्षेत्र पेंच व्याघ्रप्रकल्पाला जाेडणारा महत्त्वाचा वन्यप्राण्यांसाठी भ्रमणमार्ग आहे. मृत पावलेल्या वाघाचे वय दाेन वर्षांपेक्षा कमी असून स्वतंत्र अधिवासाच्या शाेधात असताना स्थानिक वाघांशी झालेल्या झटापटीत ताे गंभीर जखमी झाला असावा; तसेच उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला. असा प्राथमिक अंदाजही यावेळी व्यक्त करण्यात आला.शवविच्छेदनानंतर वाघाच्या मृतदेहावर अंतिम दाहसंस्कार करण्यात आले. नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्राधिकारी, सहायक वनसंरक्षक गडेगाव आगारचे प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी तपास करीत आहेत.
शवविच्छेदनातील सत्य काही वेगळेच...- वैद्यकीय शवविच्छेदनात वाघाच्या मागील पायाची चार-चार नखे गायब आहेत. ती नखे कापण्यात आली आहेत. याशिवाय जबड्यातील एक सुळा दात ताेडलेला आहे. सापड्यामध्ये अडकलेला उजवा पाय तुटलेला हाेता. सापळा रचून या वाघाची शिकार केल्यानंतर नखे कापण्यात आली असावीत व त्यानंतर त्याचा मृतदेह वितरिकेत फेकूण देण्यात आला असे तथ्य बाहेर येत आहे. या वाघाची शिकार आहे, या बाबीला डाॅ. गुणवंत भडके यांनी दुजाेरा दिला.