आमगाव (दिघोरी) : दीड महिन्यांपासून रानगव्याच्या कळपात राहणाऱ्या एका म्हशीला वाघाने ठार मारल्याची घटना कोका अभयारण्याच्या बीट क्रमांक १६४ मध्ये उघडकीस आली.
भंडारा तालुक्यातील नवेगाव येथील रूपचंद कुभरे यांची ही म्हैस होती. दीड महिन्यापूर्वी त्यांची म्हैस बेपत्ता झाली. म्हशीची शोधाशोध केली; मात्र तिच्या थांगपत्ता लागला नाही. मात्र, काही दिवसांनंतर रानगव्याच्या कळपात म्हैस असल्याची माहिती मिळाली. त्यांनी कोका अभयारण्याच्या अधिकाऱ्यांना या बाबत माहिती दिली. त्यांनासुद्धा म्हैस रानगव्याच्या कळपात असल्याचे दिसून आले. मात्र, दोन दिवसांपूर्वी बीट क्रमांक १६४ मध्ये वाघाने एका म्हशीची शिकार केल्याचे अभयारण्यातील कर्मचाऱ्यांना दिसून आले. याबाबतची माहिती कुभरे यांना देण्यात आली. अभयारण्यात हिंस्र प्राण्याने मारलेल्या पाळीव जनावरांची नुकसान भरपाई दिली जात नाही. त्यामुळे नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आहे.