लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : साकोली ते तिरोडा राज्यमार्गावरील उमरझरी परिसरात रविवारी रात्री या मार्गावरून जाणाऱ्यांना दोन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन झाले. तालुक्यातील पिंडकेपार येथील डाॅ. वसंतराव बारबुद्धे यांनी वाघिणीचा मुक्त संचार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. मात्र भररस्त्यावर व्याघ्रदर्शन झाल्याने प्रवाशांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे.डॉ. वसंतराव बारबुद्धे रविवारी रात्री साकोली ते तिरोडा राज्यमार्गाने सर्रा येथे नातेवाइकांकडे जात होते. त्यांच्यासोबत पत्नी कोकिळाबाई आणि रुग्णालयातील कर्मचारी होते. उमरझरी जंगल परिसरातून त्यांची कार जात असताना त्यांना एक वाघीण दोन बछड्यांसह रस्ता ओलांडताना दिसली. नागझिरा अभयारण्याचा परिसर असल्याने कारची गती कमी होती. अचानक वाघीण आणि बछडे दिसल्याने काही क्षण गोंधळले. मात्र नंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघीण आणि दोन बछडे कैद केले. हा परिसर नागझिरा अभयारण्याला लागून असल्याने अनेकदा वन्यप्राण्यांचे दर्शन होते; परंतु रविवारी एकाच वेळी वाघीण व दोन बछड्यांचे अशा प्रकारचे जवळून दर्शन होण्याची ही पहिलीच घटना होय. त्यामुळे या परिसरातून प्रवास करणाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.