राहुटी व चौकीतून वाहनावर निगराणी
छुप्या मार्गावर व्यापाऱ्यांची नजर
रंजीत चिंचखेडे
१५लोक १४ के
चुल्हाड ( सिहोरा ) : मध्य प्रदेशातून आयात होणाऱ्या धानावर जिल्हा पोलिसांची करडी नजर आहे. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर चौकी व राहुटीतून पोलीस वाहनावर निगराणी ठेवून आहेत. या सीमेवर पोलीस व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे व्यापारी छुप्या मार्गाचा शोध घेत असल्याची माहिती मिळाली आहे.
राज्यात परप्रांतातून आयात होणाऱ्या धानावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. राज्य सरकार शेतकऱ्यांना धानाचे बोनस जाहीर करीत असल्याने व्यापारी अन्य राज्यातून धानाची आयात करीत आहेत. यानंतर आयात होणाऱ्या धानाची स्थानिक शेतकऱ्यांचे सातबारा दस्तऐवजवर आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री करीत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. पूरग्रस्त गावात नद्याचे पाणी शिरल्यानंतर धान पूर्णतः सडले होते, परंतु या शेतकऱ्यांचे सातबारा दस्तऐवजवर धान आधारभूत धान खरेदी केंद्रांवर विक्री करण्यात आले आहे. या पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने सानुग्रह आर्थिक मदत दिली आहे.
बोनस लाटण्याकरिता व्यापारी त्यांचे सातबारा दस्तऐवजवर धानाची विक्री करीत आहेत. दरम्यान, ही धक्कादायक बाब शासनाच्या निदर्शनास आल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी परप्रांतातून येणाऱ्या धान आयातीवर पूर्णतः प्रतिबंध घालण्यात आले आहे. आंतरराज्यीय सीमा सील करण्याचे आदेश सरकारने काढले आहेत. बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकी सुरू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातून येणाऱ्या वाहनावर निगराणी ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याशिवाय चौकीत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. असे असताना अधिक कडक बंदोबस्त ठेवण्यासाठी चौकीच्या शेजारी स्वतंत्र राहुटी उभारण्यात आली आहे. ऑन दी स्पॉट कारवाईकरिता पोलिसांच्या सोबतीला महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.
आंतरराज्यीय सीमेवरून दाखल होणाऱ्या धानाचे ट्रक व अन्य वाहनांवर मोठी कारवाई करण्यास यापूर्वी पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले आहे. सिहोरा पोलीस ठाण्यात धान आयात करणाऱ्या वाहनाचे रांगा लागल्या होत्या. नंतर चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू असताना सीमेवर पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याचे कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहेत. धान खरेदी केंद्र बंद केल्यानंतर यात शिथिलता मिळणार असल्याची माहिती मिळाली आहे. सध्या स्थित दिवस-रात्र सीमेवर पोलीस आणि महसूल विभागाचे कर्मचारी वाहनांची तपासणी करीत आहेत.
बॉक्स
पोलीस चौकीचे बांधकाम होणार : बपेरा आंतरराज्यीय सीमेवर पोलीस चौकीच्या बांधकामासाठी जागा राखीव करण्यात आली आहे. लोकसहभागातून या पोलीस चौकीचे बांधकाम होणार आहे. प्रथमतःच लोकसहभागातून पोलीस चौकीचे बांधकाम होणार आहे. सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी यात पुढाकार घेतला आहे. पक्क्या इमारत बांधकामामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना सुविधा मिळणार आहेत. या चौकीत कायमस्वरूपी पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार असून, व्याप्ती वाढविणार आहेत. लगत असणाऱ्या गावातील नागरिकांना न्याय देण्याचे कार्य याच चौकीतून होणार आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. नुकतेच या चौकी बांधकामाचे भूमिपूजन झाले असल्याची माहिती मिळाली आहे.
बॉक्स
व्यापाऱ्याची नजर धरण मार्गावर
:- सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पाणी पुरवठा करण्यासाठी बावणथडी नदीवर धरणांचे बांधकाम करण्यात आले आहे. या धरणावरून वाहनांची वाहतूक सुरू आहे. या मार्गावर बंदोबस्त नाही. यामुळे धरण मार्गावर व्यापाऱ्याचे नजरा खिळल्या आहेत. याच मार्गावरून मिनी ट्रकने धान आयात करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.
कोट बॉक्स
‘बपेरा आंतर राज्यीय सीमेवर पोलीस आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याची संयुक्त नियुक्ती करण्यात आली आहे. परप्रांतातून आयात होणाऱ्या धानावर नजर ठेवली जात आहे.’
नारायण तुरकुंडे, सहायक पोलीस निरीक्षक सिहोरा