भंडारा शहरात शासकीय रुग्णालयासह काही सेवाभावी डाॅक्टरांनी काेराेना संकटाच्या काळात रुग्णांना माेठा दिलासा दिला. अतिशय माफक दरात रुग्णांवर उपचारही केले. परंतु, काही डाॅक्टरांनी या संधीचे साेनेही केले आहे. शासनाने खासगी रुग्णालयांसाठी काेराेना बाधितांवर उपचारासाठी २१ मे २०२० राेजी दरपत्रक ठरवून दिले आहे. परंतु, या दरपत्रकाप्रमाणे शुल्क आकारले जात नाही. एवढेच नाही, तर बहुतांश काेविड रुग्णालयांत शासनाचे दरपत्रकही लावण्यात आले नाही.
बाॅक्स
असे आहे शासकीय दर
काेराेनाबाधितांवर उपचारासाठी शासनाने दर ठरवून दिले आहेत. याच दराने रुग्णांवर उपचार करणे गरजेचे आहे. त्यात जनरल वाॅर्डसाठी (विलगीकरण) प्रती दिन ४००० रुपये, आयसीयू (व्हेंटिलेटरशिवाय विलगीकरण) ७५०० रुपये आणि आयसीयू (व्हेंटिलेटरसह विलगीकरण) ९००० रुपये दर निश्चित केले आहे. एक दिवसाच्या या दरामध्ये रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणे, साेनाेग्राफी, २-डी ईकाे, एक्सरे, इसीजी, मर्यादित किरकाेळ औषधी, डाॅक्टर तपासणी, रुग्ण बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छाेटे उपचार, आदींचा समावेश आहे, तर पीपीई कीट सेंट्रल लाईन टाकणे, केमाेपाेर्ट, अन्ननलिका शस्त्रक्रिया, अवयवाचा तुकडा तपासणीस पाठविणे, छातीतील, पाेटातील पाणी काढणे, काेविड तपासणी शासकीय केंद्रामध्ये माेफत, तर खासगी प्रयाेगशाळेत केल्यास शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणे आकारणी, सीटी स्कॅन, एमआरआय, पटस्कॅन यासह शिरांद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधीसाठी वेगळे दर आकारण्याचे या आदेशात म्हटले आहे. परंतु, शहरातील काही रुग्णालयांत एक दिवसाच्या घेतलेल्या दरासाेबतच डाॅक्टर तपासणी, बेड चार्ज व इतर शुल्क आकारले जाते.
बाॅक्स
पहिल्या लाटेत १७ तक्रारी, दुसऱ्यात एकही नाही
खासगी काेविड रुग्णालय शासकीय दराप्रमाणे रुग्णांना उपचार देतात की नाही यासाठी जिल्ह्यात एक पथक तयार करण्यात आले आहे. प्रत्येक उपविभागीय अधिकारी हा नाेडल अधिकारी आहे. त्यांच्या पथकात लेखाधिकारी, डाॅक्टर, पाेलीस यांचा समावेश आहे. जिल्ह्यात पहिल्या लाटेत या समितीकडे १७ तक्रारी प्राप्त झाल्या हाेत्या. या सर्वांचे निराकरण करून अधिक घेतलेले पैसे परत मिळवून देण्यात आले हाेते. परंतु, दुसऱ्या लाटेत सध्यातरी कुणीही तक्रार केली नाही. तसेच स्वत:हून या पथकानेही कुणा रुग्णालयाची तपासणी केली नाही.
काेट
खासगी रुग्णालयात अतिरिक्त बिल घेतले जात असेल तर याची थेट तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयात करावी. डाॅक्टरांनी दिलेले बिल, औषधी, खरेदीचे बिल साेबत जाेडून एका साध्या कागदावर अर्ज करावा. अर्जाची तत्काळ दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चाैकशी केली जाईल.
-अभिषेक नामदास
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, भंडारा