जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : एक दिवस मजुरांसोबतभंडारा : स्वच्छतेचा संबंध आरोग्याशी असून घरात शौचालय असणे काळाची गरज झाली आहे. प्रत्येक घरात शौचालय व प्रत्येक घरात एक शोष खड्डा निर्माण करून २६ जानेवारी २०१७ पर्यंत नागरिकांनी गुंथारा गाव हागणदारी मुक्त करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले. मनरेगा अंतर्गत एक दिवस मजूरासोबत या कार्यक्रमात ते गुंथारा येथे बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे, उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी डॉ.संपत खिलारी, तहसीलदार संजय पवार, खंडविकास अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा परिषद सदस्य बाळू कायते, पंचायत समिती सदस्य एकराम पडोळे, सरपंच शुभांगी सार्वे व सहाय्यक कामगार आयुक्त ए.एच. बेलेकर उपस्थित होते.शासनाच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना देण्यासाठी ‘एक दिवस मजुरांसोबत’ हा कार्यक्रम वर्षातून दोन वेळा आयोजित करण्यात येतो. या कार्यक्रमात शासनाच्या योजना गावकऱ्यांना सांगितल्या जातात. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, ज्यांनी कामाची मागणी केली त्यांना १५ दिवसात काम मिळायला हवे. शासनाने या मनरेगात ११ वैयक्तिक स्वरुपाच्या कामाचा समावेश केला असून या कामांची यादी नागरिकांनी ग्रामसभेत यंत्रणांना द्यावी. वैयक्तिक कामासाठी शासन पैसे देणार असून गावकऱ्यांनी वैयक्तिक स्वरूपाच्या ११ कामाचे नियोजन करण्याचे आवाहन त्यांनी केले.प्रत्येक नागरिकांनी घरात शौचालय बांधणे व शोष खड्डा निर्माण करणे आवश्यक असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शौचालयासाठी आता शासन १२ हजार रुपये अनुदान देते. याचा लाभ घ्यायला हवा. २६ जानेवारीपर्यंत गुंथारा गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्धार गावकऱ्यांनी करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले. शाळा व आंगणवाड्या या महत्वाच्या संस्था असून भावी पिढी घडविण्याचे हे मंदिर आहे. याकडे गावकरी म्हणून अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.गुंथारा गाव हे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट असून जलयुक्त शिवारमध्ये मजगी, गाळ काढणे, मामा तलाव, बंधारे व विहिरीची कामे मोठ्या प्रमाणात सूचवावी. यंत्रणांनी गावकऱ्यांना विश्वासात घेवून जलयुक्त शिवार आराखडा तयार करावा. आराखड्यानुसार कामे होतात की नाही हे गावकऱ्यांनी तपासावे, असे आवाहन त्यांनी केले. गावकऱ्यांनी स्वत:ला स्वच्छतेची सवय लावून घ्यावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. अहिरे यांनी केले. आजच्या कार्यक्रमात विविध योजनांचे अर्ज घेण्याची व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी योजनांचा लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. २ आॅक्टोबर होणाऱ्या ग्रामसभेत जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे, असेही त्यांनी सांगितले. यासोबतच महाअवयव दानासाठी अर्ज भरून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या कार्यक्रमात अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, बिपीएल दाखला, जॉब कार्ड व सामूहिक वन हक्क प्रमाणपत्र ग्रामस्थांना वाटप करण्यात आले. यावेळी बाळू कायते यांनी मार्गदर्शन केले. (नगर प्रतिनिधी)
२६ जानेवारीपर्यंत गुंथारा हागणदारीमुक्त गाव करा
By admin | Published: October 02, 2016 12:38 AM