मोहाडी तालुक्याचे प्रमुख पीक भात आहे. तालुक्यातील बहूतेक शेती कोरडवाहू प्रकारची असून आजही मोठी लोकसंख्या ग्रामीण भागात वास्तव्यास आहे. शेतीचा हंगाम संपल्यानंतर ग्रामीण कामगार, शेतकरी व शेतमजूरांच्या हाताला कामे मिळत नाही. अशावेळी त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यास महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना उपयोगी ठरत असते. परंतू मजुरांच्या हाताला कामे देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आज वेतनाअभावी हाल झाले आहेत, दिवाळी प्रकाशाचा सण अंधारात गेला आहे. कर्मचाऱ्यांत रोषाचे वातावरण आहे.
तालुक्यात रोहयो विभागात डाटा एंट्री ऑपरेटर ५, तांत्रीक व कृषी पॅनल अधिकारी ११, १ एपीओ, असे एकूण ११ कर्मचारी कार्यरत आहेत. रोहयो एपीओ, तांत्रीक व कृषी पॅनल अधिकाऱ्यांना मासिक २०,८०० रूपयांचे दरमहा मानधन शासनाच्या वतीने दिले जाते. तर डाटा एंट्री कर्मचाऱ्यांना मासिक १६ हजार रूपये मानधन दिले जाते. या कर्मचाऱ्यांना ऑक्टोंबर पासून वेतन मिळालेले नाही. प्रकरणी वरिष्ठांनी तात्काळ दखल घेवून वेतन देण्याची मागणी होत आहे. वेतन न मिळाल्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कर्मचा-यांनी दिला आहे..