भंडारा : टिप्पर व दुचाकीत आमोरासमोर झालेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना गुरूवारला दुपारी १:३० वाजताचे सुमारास केसलवाडा (पालोरा) वळणावर घडली. मृतकाचे नाव ज्ञानेश्वर मनोहर हातझाडे (२८) रा. कोका असे आहे. तर करडी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या टिप्परचालकाचे नाव मंगेश चाचेरे (३६) रा्. कोकणागड, ता. भंडारा, असे आहे.
सविस्तर असे की, ज्ञानेश्वर हातझाडे हा काही कामानिमित्त कोका गावावरून पालोरा येथे आला होता. दुपारी काम आटोपून तो केसलवाडा मार्गे कोका येथे जात होता. तर टिप्पर चालक साकोलीवरून पालोराकडे जात होता. दोन्ही वाहन चालकास विरूद्ध दिशेने येणारे वाहन दिसून न आल्याने दोन्ही वाहनांची आमोरासामोर धडक बसली. यात दुचाकीचालक ज्ञानेश्वर हातझाडे जागीच ठार झाला. घटनेची माहिती होताच करडी पोलिस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र गायकवाड पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी हजर झाले. टिप्पर चालक मंगेश चाचेरे यास ताब्यात घेण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
झाडे-झुडपे ठरली अपघातास कारणीभूत
देव्हाडा ते साकोली मार्गावरील केसलवाडा वळण मार्गावर मोठ्या प्रमाणात झाडे व झुडपी आहेत. तसेच जवळच कोका वन्यजीव अभयारण्याची तपासणी चौकी आहे. झाडे-झुडपांमुळे वळणमार्गावर विरूद्ध दिशेने येणारी वाहने दिसून येत नाही. त्यामुळे तातडीने वळण मार्गावरील झाडे व झुडपांची साफसफाई करण्याची मागणी होत आहे.