भंडारा : रिकाम्या टिप्परने माडगीतील एका वीज खांबाला धडक दिल्याने खांबाचे दोन तुकडे झाले. विजेच्या तारा लोंबकळल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वी रेतीच्या एका टिप्परने गावाच्या प्रवेशद्वाराला धडक दिली होती. गावाचे प्रवेशद्वार खाली कोसळले होते. माडगी येथे मागील काही दिवसांपासून नियमबाह्यपणे रेतीचा उपसा सुरू असून, वाहतूक सुरू आहे. दोन दिवसांपासून महसूल प्रशासनाने येथे तलाठ्याला नियुक्त केले आहे.
माडगी येथे गावाजवळून वैनगंगा नदी वाहते. येथील नदीपात्रातून रेतीतस्कर सर्रास नियमबाह्यपणे रेतीचा उपसा करीत आहेत. गावाच्या वेशीवरच त्यांनी रेतीचा साठा करून ठेवला आहे. ट्रक व टिप्परमध्ये रेती भरून ती अन्य शहरात वाहून नेली जाते. एका रिकाम्या विजेच्या खांबाला जोरदार धडक दिली. त्यात विजेचा खांब अक्षरश: वाकला. विजेच्या तारा खाली लोंबकलळल्या. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. पंधरा दिवसांपूर्वी एका रेतीच्या टिप्परने गावाच्या प्रवेशद्वाराला धडक दिली होती. त्यात संपूर्ण प्रवेशद्वार खाली कोसळले होते. त्यानंतरही रेतीच्या ट्रकची वाहतूक येथे सुरू होती.
माडगी गावात जाणारा रस्ता हा निमुळता असून, दोन्ही बाजूंना घरे आहेत. अनियंत्रित ट्रकमुळे येथील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. टिप्परने येथे दोनदा दिवसाढवळ्या धडक दिली; परंतु त्यावर अद्याप कारवाई झाली नाही. महसूल प्रशासनाने येथील रेतीचोरी व रेतीवाहतुकीवर अद्याप कारवाई केली नव्हती. ‘लोकमत’ने वृत्ताच्या माध्यमातून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर महसूल प्रशासनाने येथे रेतीचोरीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याकरिता तलाठ्याची नियुक्ती केल्याची माहिती आहे. रेतीतस्करांनी लाखो रुपयांची कमाई केली. सध्या नदीमध्ये मोठमोठे खड्डे पडले असून, नदीपात्रात रेतीच शिल्लक राहिलेली नाही. रेतीतस्करांनी संपूर्ण नदीघाट पोखरून काढला. त्यानंतर महसूल प्रशासनाने थातुरमातुर कारवाई केली आहे.