अनेक बेरोजगार उपेक्षित : एका परीक्षेचा खर्च हजाराच्या घरातखराशी : ‘इकडे तिकडे लक्ष न देता स्पर्धा परीक्षेची तयारी कर आणि नोकरी मिळव’ असे सांगणारे मार्गदर्शक बेरोजगारांना भरपूर मिळतात. सध्या स्पर्धा परीक्षा नोकरी मिळविण्याचे सर्वोत्तम मार्ग ठरले आहे. यामुळे अनेकांच्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश निर्माण झाला असला तरी आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना स्पर्धा परीक्षेचे शुल्क भरताना दमछाक होत आहे. मागील दोन-तीन वर्षात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे. स्पर्धा परीक्षा शुल्क ३००, ५०० आणि ७०० रूपयांपर्यंत वाढल्यामुळे बेरोजगारांची चिंता वाढली आहे. एखाद्या परीक्षेचा फार्म भरण्यापासून ते परीक्षा होईपर्यंत खर्च हजार रूपयांच्या घरात असतो. फार्म भरणे, डिमांड ड्रॉफ्ट काढणे, परीक्षेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा नागपूरसारख्या शहरात जाणे येणे करण्यापर्यंतचा खर्च हजार रूपये असून स्पर्धा परीक्षा देताना नाकीनऊ येत आहे. बँक, जिल्हा परिषद व अन्य विभागातील विविध रिक्त पदासाठी परीक्षा घेण्यात येतात. हा उत्तम मार्ग असला तरी आर्थिक परिस्थिती हलाखीच्या असणाऱ्या सुशिक्षित बेरोजगारांना फार्म भरण्यापूर्वी खिशाचा विचार करावा लागतो. परीक्षेच्या नियोजनासाठी लागणाऱ्या खर्चाच्या दुप्पट रक्कम शासनाच्या तिजोरीत परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जमा करण्यात येते. या प्रश्नावर कुणाचेही लक्ष नसून गरीब परिस्थिती असणारा पण गुणवत्ताधारक बेरोजगार मागे पडत आहे. परीक्षा शुल्काचे निश्चितीकरण करून सामान्य विद्यार्थ्यांच्या खिशाला कात्री न लावता गुणवत्ताधारकांना न्याय देईल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
स्पर्धा परीक्षा शुल्क वाढीमुळे बेरोजगारांची दमछाक
By admin | Published: January 05, 2016 12:36 AM