भंडारा : आदर्श राष्ट्रवादाची प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काही युवक सद्भावना जागर करणार आहेत. यात यासंदर्भात शिवतीर्थ मानव कल्याणकारी संस्था खराशीने पुढाकार घेतला आहे. संस्थापक डमदेव कहालकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविला जात आहे.
भंडारा जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दिघोरी (मोठी) ते चूलबंद नदी तीरावरील देवस्थानपर्यंत तरुण पायी जाणार आहेत. यात खराशी व खुनारी येथील तरुणांचाही सहभाग असणार आहे. पायी चालून तरुण सद्भावना जागर करणार आहेत. यात सद्भावना ज्योत घेऊन हे तरुण चूलबंद नदी तीरावर जातील. आदर्श राष्ट्र निर्माणाचा संदेश देत युवक स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शनही करणार आहेत. स्वामी विवेकानंद हे तरुणांचे प्रेरणास्थान आहेत. याशिवाय विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्तेही त्यांचे स्वागत करतील.