लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : मोबाइल बघितल्याशिवाय तरुणांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. मोबाइलवर तासन् तास वेळ घालवल्यानंतर दिवसभर संगणकावर काम सुरू राहते. सतत संगणक व मोबाइल स्क्रीनकडे पाहिले जाते. रात्री उशिरा देखील डोळा लागेपर्यंत नजर मोबाइलच्या स्क्रीनकडेच असते. परिणामी तरुणांसह लहान मुलांमध्येही मोबाइल सिंड्रोमचे प्रमाण वाढत असून, कमी वयात चष्मा लागणे तसेच डोळ्यांशी निगडित आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती आहे.
कार्यालयीन कामकाजामुळे दिवसभर ऑनस्क्रीन असलेला तरुण तरुणींचा एक वर्ग आहे, तर दुसरीकडे मोबाइल स्क्रीनवर तासन् तास वेळ घालवणाराही वर्ग आहे. गेमिंग, व्हिडीओ कॉलिंग, चॅटिंगमध्ये हा वर्ग तासन् तास ऑनस्क्रीन व्यस्त आहे. फक्त तरुण-तरुणीच नव्हे, तर हल्ली सर्वच वयोगटांतील व्यक्ती उशिरापर्यंत मोबाइलचा वापर करतात. मात्र स्मार्टफोन्सचा अतिवापर, विशेषतः रात्रीच्या वेळी केला जाणारा वापर हा दृष्टीसाठी अत्यंत अपायकारक असतो, परंतु बहुतांश जण याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो.
मोबाइलच्या अतिवापराचे परिणाम डोळ्यातून सतत पाणी येणे, डोळे कोरडे होणे, लाल होणे, दुखणे, चष्मा लागणे, चष्याचा नंबर वाढणे
हे करून पाहा
- सातत्याने स्क्रीनकडे नजर राहत असल्याने डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळ्यांशी निगडित विविध समस्या उद्भवतात.
- हे टाळण्यासाठी डॉक्टर २०-२०-२० फॉर्म्युला उपयोगी पडू शकतो. यामध्ये २० मिनिटे काम केल्यानंतर विश्रांती घ्या.
- नंतर २० फूट दूर २० सेकंद बघा तासन् तास मोबाइल किंवा संगणक स्क्रीनवर राहणे डोळ्यांसाठी अपायकारक आहे.
ही घ्या काळजी
- अधिक वेळ मोबाइल, संगणकाचा वापर टाळणे, स्क्रीनकडे सतत पाहावे लागत असेल, तर ३० मिनिटांनंतर डोळ्यांना आराम द्यावा.
- टेबल, खुर्चीवर बसून काम करणे.
- मोबाइल नजरेच्या अगदी जवळ धरून पाहू नये.
- डोळ्यांच्या त्रासावर स्वतःहून कोणतेही ड्रॉप वापरू नये.
"संगणक किंवा मोबाइल स्क्रीनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मॅग्नेटिक वेव्ह डोळ्यांसाठी घातक आहे. विशेषतः तरुणांसोबतच लहान मुलं रात्री उशिरापर्यंत मोबाइल स्क्रीनवरच असतात. त्यामुळे डोळ्यांशी निगडित विविध आजार उद्भवत आहेत. मुलांचा स्क्रीन टाइम कमी व्हावा, पालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची गरज आहे." - डॉ. योगेश जिभकाटे, नेत्ररोग तज्ज्ञ