पावसाळ्याच्या दिवसात बाजारात भाजीपाला अत्यल्प दिसून येतो. भंडारा जिलह्यात तर मराठवाड्यासह मध्य प्रदेशातून भाजीपाला आयात करावा लागत होता, परंतु बीटीबी सब्जी मंडीच्या मार्गदर्शनात शेतकरी भाजीपाला पिकाकडे वळला आहे. वैनगंगा, चुलबंद नदीच्या खोऱ्यात आता मोठ्या प्रमाणात शेतकरी धानासोबत भाजीपाल्याचे पीक घेत आहे. भाजीपाला हा रोख पैसे देणारे पीक आहे. केवळ ४५ दिवसांत शेतकऱ्यांच्या हातात उत्पादन येते. नजरेच्या समोर अपेक्षित भाव मिळतो. बीटीबीसारखी हक्काची बाजारपेठ आहे. त्यामुळेच शेतकरी आता बारमाही भाजीपाला उत्पादन करू लागले आहे.
जिल्ह्यात वांगे, टमाटर, भेंडी, चवळी, लवकी, काकडी, कारले, गवार, वाल, मिरची, कोवळे, सांभार या पिकांचे नियोजन केले जात आहे. केवळ फुलकोबी आणि टोमॅटो पिकविताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहे. विशेष म्हणजे, पिकविलेल्या भाजीपाल्याला चांगला दरही मिळत आहे. जिल्ह्यात सध्या दररोज २० टन वांग्यांची आवक होत असून, शेतकऱ्यांना २० रुपये किलोप्रमाणे दर मिळत आहे.
कोट
जिल्ह्यातील पैसा जिल्ह्यातच राहावा. शेतकऱ्यांच्या घामाला योग्य दाम मिळावे, यासाठी बीटीबी सब्जी मंडीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यातील भाजीपाला परदेशातही पाठविला जात आहे. दररोज नगदी पैसे मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. पूर्वी इतर भागातून भाजीपाला मागवावा लागत होता. तो महाग पडत होता, परंतु आता स्थानिक शेतात पिकलेला भाजीपाला योग्य दरात ग्राहकांना मिळत असून, शेतकऱ्यांनाही त्यांच्या घामाचे दाम मिळत आहे.
- बंडू बारापात्रे, अध्यक्ष, बीटीबी सब्जीमंडी.
कोट
वर्षभर भाजीपाला पिकाचे उत्पादन घेत असतो. माझ्यासह पालांदूर परिसरात अनेक शेतकरी बारमाही भाजीपाला पिकवित आहे. आम्ही वांग्याचे पीक घेणे सुरू केले. २० रुपये किलोचा दर शेतकऱ्यांना पुरेसा आहे. बीटीबी सब्जीमंडी शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
- प्रशांत खंगार, शेतकरी पालांदूर.