ज्ञानेश्वर मुंदे।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाताचे कोठार असलेला भंडारा हा उत्सवप्रिय जिल्हा. मंडई, भागवत सप्ताह, नाट्यप्रयोग असे गावागावांत उत्सव सुरु असताना उन्हाळ्याची चाहूल लागली की गावकऱ्यांना वेध लागतात शंकरपटाचे. मात्र गत काही वर्षांपासून न्यायालयाच्या निर्णयाने बैलांचे पट बंद झाले. परंतु उत्सवप्रिय जिल्ह्यातील ग्रामीणांनी यावरही पर्याय शोधला. बैलांऐवजी आता ट्रॅक्टरचे शंकरपट सुरु झाले.सर्वोच्च न्यायालयाने जनावरांच्या शंकरपटांवर बंदी घातली. अनेक उत्साही नागरिकांचा हिरमोड झाला. आता शंकरपटाचे काय असा प्रश्न निर्माण झाला. मात्र त्यावरही मात करणार नाही ते ग्रामीण कसले. जिल्ह्यात बैलांचा शंकरपट भरविण्याची शतकोत्तरी परंपरा आहे. लाखांदूर तालुक्यातील मासळ येथील दीडशे वर्षापासून शंकरपट भरविला जात होता. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव (सडक) येथील शंकरपट अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. मासळ, पिंपळगाव सारखे गावागावात छोटेमोठे पट भरायचे. श्रमाच्या देवतेचे कौतूक व्हायचे. पिळदार देहयष्टीचे बैल पाहून शेतकरी राजा खुश व्हायचा. परंतु ही नवलाई संपली. नागरिकांचा हिरमोड झाला परंतु त्यावरही पर्याय शोधला. आता गावागावांत सुरु झाले ट्रॅक्टरचे पट.
शंकरपटात टॅक्टर चालवावा लागतो रिव्हर्सबैलांचे शंकरपट भरविले जातात त्याच पद्धतीने ट्रॅक्टरचे शंकरपट भरविले जात आहेत. पटासाठी ट्रॅक तयार केला जातो. ट्रॅक्टर रिव्हर्समध्ये चालवायचे असतात. ट्रॅक्टरचे चाक जराही ट्रॅकबाहेर गेले तर स्पर्धक बाद होतो. कमीत कमी वेळात पोहचण्याची ही शर्यत असते. अनेक गावात पहिल्यांदाच भरलेला हा ट्रॅक्टर शंकरपट पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.