तुमसर-बपेरा राज्य मार्गाच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळाल्या नंतरही कामांना सुरुवात करण्यात आली नाही. आठवडाभरात सहा अपघात झाले. राज्य मार्ग दुरुस्ती व नूतनीकरणाचे घोडे कुठे अडले, कुणी सांगायला तयार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाची यंत्रणा निधी नसल्याचे तुणतुणे वाजवित आहे. दरम्यान राज्य मार्गावर नाकाडोंगरी मार्गावरील जड वाहतूक वळते करण्यात आली आहे. निश्चितच वाहनांची वर्दळीत वाढ झाली आहे. भरधाव वेगाने वाहने धावत आहेत. सिहोरा गावात राज्य मार्ग अरुंद असल्याने पार्किंगची मोठी समस्या आहे. दुहेरी वाहने काढताना कसरत करावी लागत आहे. अत्यंत गर्दीच्या ठिकाणी बसस्थानक असून प्रवासी व नागरिकांची गर्दी राहत आहे. दुपारी ४ वाजता शाळकरी विद्यार्थ्यांचे संख्येने फुल्ल होत आहे.
शनिवारचा आठवडी बाजार तर चक्क राज्य मार्गावर थाटला जातो. पोलिसांनी दुकानदारांना राज्य मार्ग सोडून दुकाने लावण्याची तंबी दिली होती. राज्य मार्गाने मोकळा श्वास घेतला होता. पुन्हा राज्य मार्गाचा श्वास गुदमरायला लागला आहे. कुणी ऐकायला तयार नाहीत.
बॉक्स
बसस्थानकावर सुरक्षा वाढवा
बसस्थानकात शाळकरी विद्यार्थ्यांची गर्दी होते. अपघात टाळण्यासाठी शालेय व्यवस्थापन सुरक्षा देत आहेत. आदर्श विद्यालय, महाराष्ट्र हायस्कूलचे शिक्षक नियुक्त केले जात आहेत. यामुळे विद्यार्थी सुरक्षित घरी परतत आहेत. वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येत आहेत. परंतु पोलिसांचे रिक्त जागा असल्याने नियमित पोलीस नियुक्त करण्यात येत नाहीत. महाविद्यालय बसस्थानकाशेजारी असल्याने विद्यार्थी संख्या राहत आहे. घरी परतण्याची विद्यार्थ्यांना लगबग राहत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सुरक्षा वाढविण्याची मागणी होत आहे.