नाकाडोंगरी राज्यमार्गावरील वाहतूक वळविण्यात आल्याने तुमसर-बपेरा राज्यमार्गावर वाहतुकीचा ताण वाढला आहे. राज्यमार्गावर वाहने भरधाव असल्याने अपघात वाढले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेता सहायक पोलीस निरीक्षक नारायण तुरकुंडे यांनी सिहोऱ्याचा राज्यमार्गाच्या कडेला भरणारा आठवडे बाजार तेथून हलविला आहे. आठवडे बाजारात ग्राहक व दुकानदारांची वर्दळ असल्याने हा सकारात्मक निर्णय त्यांनी घेतला आहे. दरम्यान, तुमसर-बपेरा राज्यमार्गावर जीवघेणे खड्डे पडले आहेत. दुरुस्ती करूनही आठवडाभरात खड्डे तयार होत आहेत. यामुळे खड्डे चुकवण्याच्या नादात अपघातांत वाढ झाली आहे. अपघात थांबविण्यासाठी राज्यमार्गावर गतिरोधक तयार करण्याची ओरड गावकरी करीत आहेत. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला राज्यमार्गावर गतिरोधक तयार करण्यासाठी पत्र दिले. परंतु या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही. पोलिसांचे पत्राला बेदखल करण्यात आल्याने गतिरोधकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग फक्त खड्डे बुजविण्यात व्यस्त असला तरी अपघात थांबले नाहीत. वाहने वेगात धावत असल्याने अपघात होत आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग गंभीर दिसत नाही. राज्यमार्गावर वाढत्या झुडपांचा प्रश्न कायम आहे. राज्यमार्ग अरुंद असल्याने अपघात वाढत आहेत. परंतु कुणी गांभीर्याने घेत नाही. या राज्यमार्ग दुरुस्तीच्या निविदा निघाल्या आहेत. परंतु प्रत्यक्षात कामांना सुरुवात झालेली नाही. घोडे कुठे अडले आहे, कुणी सांगायला तयार नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तिजोरीत निधी नसल्याचे सांगण्यात येत आहेत. राज्यमार्ग दुरुस्तीवरून नागरिकांत आक्रोश आहे. राज्य सरकारने तत्काळ राज्यमार्ग दुरुस्तीच्या कामांना मंजुरी देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ReplyReply allForward