केशोरी : येथे दर सोमवारी आठवडी बाजार भरत असून, बाजार परिसरात जि.प. प्राथ. शाळा, पोलीस स्टेशन, को-ऑप. बँक, विविध कार्यकारी संस्थेचे व वन विभागाचे कार्यालय आहेत. येथे येणाऱ्या वाहनांची दिवसभर वर्दळ असते. येथे वाहने ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे रस्त्यावर जिथे जागा दिसेल त्या ठिकाणी वाहने उभी करून वाहतुकीची कोंडी निर्माण करीत असतात. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन होत असलेली वाहतुकीची कोंडी दूर करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी हे गाव या परिसरातील बाजारपेठेचे प्रमुख ठिकाण आहे. येथील आठवडी बाजार भरण्याची जागा अपुरी पडत असल्यामुळे बरेच व्यावसायिक मंडळी सार्वजनिक रस्त्यावर आपली दुकानदारी थाटत असल्यामुळे या परिसरात असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पोलीस स्टेशन को-ऑप. बँक, विविध कार्यकारी संस्थेचे कार्यालय, वन विभागाच्या कार्यालयात येणाऱ्या लोकांना वाहन ठेवण्यासाठी जागा राहत नसल्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी करीत असल्याने सतत या रस्त्यावर वाहनांची कोंडी निर्माण होत असते. बाजाराच्या दिवशी वाहनांची पार्कींग व्यवस्था ग्रामपंचायतने करून देणे गरजेचे असताना याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे.