दारूबंदी गावातील पुढाकार : जांभळी सडक येथील महिलांचा निर्धारसाकोली : जे काम शासनाने करायला पाहिजे ते काम जांभळी सडक येथील महिला करीत आहेत. जांभळी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व दारूबंदी समितीच्या महिलांनी पुढाकार घेवून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधींना भेटून त्यांना लेखी सुचना देत आहेत. या निवडणुकीदरम्यान दारू पैसा, अथवा कोणतेही आमिष दाखविल्यास त्या उमेदवारांना मतदानच करणार नाही, अशी तंबीही देत आहेत.मागील एक वर्षांपासून जांभळी येथे महिलांनी पुढाकार घेवून गावातील संपूर्ण दारूबंदी केली. एवढेच नाही तर गाव परिसरातील हातभट्ट्याही बंद करण्यात आल्या होत्या. आता जिल्हा परिषदा व पंचायत समितीच्या निवडणूक लागल्या. त्यामुळे मतासाठी उमेदवार पैसा व दारू वाटतात. त्यामुळे गावात पुन्हा लोकांना दारूचा व्यसन लागेल व पुन्हा ते दारूच्या आहारी जातील. त्यामुळे उमेदवारावरच पाळत ठेवायची, असा निर्धार येथील महिलांनी घेतला आहे. या महिलांनी एक पत्र काढले असून या पत्रानुसार, मौजा जांभळी सडक येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती ग्रामपंचायत कमेटी व दारूबंदी समिती यांची सामुहिक सभा घेण्यात आली या सभेच्या निर्णयानुसार निवडणुकीच्या निमित्ताने दारू, पैसा, अथवा कोणतेही मादक पदार्थाचे आमिष मतदारांना दाखवू नये, गावामध्ये कोणी दारूपिऊन शिवीगाळ करतानी आढळल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल व या नियमांचे पालन न केल्यास गावातील महिला मतदानच करणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. गावातील ही दारूबंदी अविरत बंद राहावी यासाठी गावाच्या सरपंच शिशुकला नंदुरकर, तंटामुक्तीच्या अध्यक्षा सुमत्रा तिरपुडे, नाजुका गजभिये, मंदा रामटेके, जया लांजेवार, प्रतिमा गिरडकर, वैजंता लांजेवार, प्रयत्नशिल आहेत. जांभळी येथील महिलांच्या या निर्णयामुळे उमेदवार तुर्तास तरी अडचणीत आले असून मतदारांची मनधरणी कशी करायची याचा विचार करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
आमिष दाखविणाऱ्यांना रणरागिनींची तंबी
By admin | Published: July 01, 2015 12:58 AM