गोंदिया : मार्चपर्यंत ‘ब’ यादीतील लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र, अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. कित्येक लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याने त्यांना बांधकाम बंद करावे लागले आहे. अशात लाभार्थ्यांच्या खात्यात ३० मेपर्यंत हप्ते वळते करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा आ. विनोद अग्रवाल यांनी पंचायत समितीमधील अधिकारी व अभियंत्यांना दिला आहे.
येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी तसेच पंचायत समिती घरकुल विभागाच्या सर्व कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंत्यांना घेऊन आ. विनोद अग्रवाल यांनी आढावा बैठक घेतली. विशेष म्हणजे, मार्च 2021 पर्यंत ‘ब’ यादीतील सर्व लाभार्थ्यांचे घरकुलाचे काम पूर्ण झाले पाहिजे होते; परंतु मे महिन्याच्या अखेरीसही अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली. प्रशासकीय अधिकारी तसेच अभियंत्याच्या निष्काळजीपणामुळे कामे पूर्णत्वास जाऊ शकली नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. गावातील रोजगार सेवक कामाची मागणी करण्यासाठी टाळाटाळ करतात, असे आढळून आलेले आहे. अशा रोजगार सेवकांवर तात्काळ कार्यवाही करून लाभार्थ्यांचे मस्टर तात्काळ तयार करून कामाला सुरुवात करावी. काही रोजगार सेवकांनी कामाची मागणी केली असता त्यावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याची तक्रार लाभार्थ्यांकडून केली जाते. यासंबंधी चर्चा करत आ. अग्रवाल यांनी रोजगार सेवकांकडून सादर केलेले मस्टर तात्काळ मंजूर करून लाभार्थ्यांना काम मंजूर करण्याचे निर्देश दिले.
लाभार्थ्यांना हप्ते न मिळाल्याने त्यांच्या घराचे कामे थांबून आहेत. शासनाने घरकुलासाठी पैसे दिले असूनही लाभार्थ्यांना पैसे का दिले जात नाहीत, असाही सवाल उपस्थित केला. मागील महिनाभर लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून रेती उपलब्ध करून दिली जाणार होती; परंतु रेतीचे घाट लिलाव न झाल्याने लाभार्थ्यांना रेती उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे स्वस्तातील रेती महागात खरेदी करून लाभार्थ्यांनी स्वखर्चातून घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. तरीही अद्याप लाभार्थ्यांना शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या घरकुलाच्या पैशाचे हप्ते न मिळाल्याने बांधकाम बंद केलेला आहे.
कित्येक लाभार्थी घरकुल योजनेचा लाभ मिळूनही कर्जबाजारी झाले असल्याचे आ. अग्रवाल यांच्या निदर्शनात आल्यावर त्यांचा अधिकाऱ्यांवर अधिकच पारा चढला. यावर त्यांनी अधिकारी व अभियंत्यांना ३० मेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना त्यांचे घरकुलाचे सर्व हप्ते अदा करण्याबाबत सूचना केल्या व असे न केल्यास संबंधित अधिकारी तसेच अभियंत्यांवर कारवाई करण्यास विलंब केला जाणार नाही अशी ताकीद दिली.
चार हजार लाभार्थी हप्त्यांपासून वंचित
गोंदिया तालुक्यात २३४७१ घरकुल लाभार्थ्यांना बांधकामाची परवानगी देण्यात आली होती, यापैकी १९४७७ लाभार्थ्यांना संपूर्ण पैसे अदा करण्यात आले. उर्वरित चार हजार लाभार्थ्यांना अद्याप त्यांची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याने त्रासाला सामोरे जावे लागत आहे. आ. अग्रवाल यांनी झीरो पेंडन्सी दाखवत महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम अदा करण्याची अधिकाऱ्यांना ताकीद दिली आहे.