सिराज शेखलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती चोरीसाठी प्रसिद्ध मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावर तहसीलदारांनी २४ तास खडा पहारा सुरू केला. नेहमी पहाटेला ट्रॅक्टर, जेसीबीने गजबज राहणाऱ्या या घाटांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रेती माफियांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे रेतीमाफिया आता लोकप्रतिनिधींना एकदाची तहसीलदारांची बदली करा हो, असे साकडे घालत आहेत.तालुक्यातून वाहणारी वैनगंगा व सुर नदी रेतीचोरांसाठी तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. यातील काहींनी या काही वर्षात चांगली माया जमविली; मात्र सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे. नदीतून काढून कुरोडा स्मशानभूमीजवळील १५० ते २०० ब्रास व रोहा येथील उत्तरेकडील तलावाजवळील २०० ब्रास डम्पिंग केलेली रेतीसुद्धा जप्त करण्यात आली. नदीतून दररोज १०० ब्रास रेतीची होणारी चोरी बंद झाली. रोहा, बेटाळा येथे ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी अंगणाची शोभा वाढवीत आहे.
कोट्यवधींचा महसूल प्राप्त
- सहा महिन्यात तहसीलदार कारंडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने जवळपास चार कोटींचा महसूल प्राप्त झाला. नागपूर विभागात हा एक रेकाॅर्ड आहे. जवळील भंडारा, तुमसर आणि पवनी तालुक्यातसुद्धा वैनगंगा नदीचे मोठे रेती घाट असून, तिथेही अवैध रेती उपसा सुरू असतो; मात्र धडक कारवाई होत नसल्याने इतका महसूल दोन वर्षातसुद्धा प्राप्त झाला नसेल.सुपूर्दनाम्यावर वाहन सोडणे बंद- वाहन जप्त करून दंड ठोठावला तर रेतीमाफिया दंड न भरता वाहन सुपूर्तनाम्यावर सोडवून घेत होते. घेर्त्यामुळे वाहनावर कारवाई झाली तरी टेन्शन नव्हते. यावर येथील तहसीलदारांनी सोडून दिलेल्या वाहनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शासनाच्यावतीने अपील दाखल केले. याचिकेतील युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता पकडलेली वाहने दंड भरल्याशिवाय सुपूर्तनाम्यावर सोडणे बंद झाले.