पंधरा दिवसांत समितीने मोक्षधामचा चेहरामोहरा बदलवण्याचे काम केले आहे. समितीने अजूनपर्यंत कोणाकडे जाऊन मदत मागितली नाही. समितीने सुरू केलेले काम पाहता समितीच्या सदस्यांकडे दानदाते नागरिकांनी स्वतः पुढे हात करत मदतीचा ओघ चालवला आहे. समितीचे सर्व सदस्य रोज कामावर लक्ष केंद्रित करून कामाची माहिती सोशल मीडियावर जनतेपर्यंत पोहोचवत आहेत. आतापर्यंत मोक्षधाम तुमसर येथे अनेकदा वृक्षारोपण करण्यात आले; परंतु वृक्ष दिसतच नाही, असा प्रकार समितीला समजला. समिती आता दहा ते वीस फुटांचे मोठे वृक्ष आणून ते लावत आहे, तर ज्या ठिकाणी प्रेत जाळण्यात येते त्या प्लॅटफार्मला सिमेंट काँक्रिटने दुरुस्ती करत नवीन पेव्हर ब्लॉक लावून सुशोभित केले आहे. दोन प्लॅटफार्मचे काम पूर्णत्वास आले असून काम पूर्ण होताच दुसरे दोन प्लॅटफार्मचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष बंडूभाऊ बांडेबुचे यांनी दिली.
नाल्यावर पडलेल्या खाडीत मलबा टाकून रस्ता मजबूत करण्याचे कामसुद्धा सुरू आहे. संपूर्ण परिसरात असलेल्या वृक्षांना ओटे बनवण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पाच हजार स्क्वेअर फूट जागेवर पेव्हर ब्लाॅक लावण्याचा मानस समितीचा आहे. त्यादृष्टीने समोरची वाटचाल सुरू आहे. संपूर्ण मोक्षधाम परिसर सुशोभित व सुंदर बनविण्याचा मानस समितीने आखला आहे. टप्प्याटप्प्यात हे सर्व काम होणार असून काही दिवसांत होणाऱ्या सर्व प्रकारच्या कामाची ब्लू प्रिंट फ्लेक्स बोर्डवर तुमसर नगरातील जनतेसमोर लावण्याचा प्रयत्न समितीचा असल्याचे समितीचे सचिव अनिल कारेमोरे यांनी सांगितले.
या मोक्षधाम सौंदर्यीकरणाच्या ईश्वरीय कार्यात सर्वांनी सहभाग द्यावा, असे आवाहनही समितीचे अध्यक्ष व सचिव यांनी केले आहे. या कार्यात समितीचे सर्व सदस्य विष्णू जोशी, मोहन बोरघरे, भारत भेदे, प्रशांत आंबीलढुके, राजेश माधवानी, बाल्या मदनकर, विनोद लांजेवार, बालू मस्के, तरुण साधवानी, सुरेश समरीत, किशोर हटवार, दिगंबर समरित, विकास निखाडे आदी प्रयत्नशील आहेत.