पत्रपरिषद : नवे पोलीस अधीक्षक विनीता साहू भंडारा : जिल्ह्यातील अस्ताव्यस्त वाहतूक समस्या सुरळीत करण्यासोबतच अवैध व्यवसायावर आळा घालणे आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी प्रभावी मोहीम राबविण्यात येईल, असे माहिती नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी आयोजित पत्रपरिषदेत दिली.यावेळी त्या म्हणाल्या, रूजू झाल्यानंतर अधिकारी आणि ठाणे प्रमुखांची बैठक घेऊन जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यानुसार जिल्ह्यात घडणाऱ्या घटनांवर आळा घालण्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्यात आला आहे. एक महिन्यानंतर स्वत: या प्रारूपाचे अध्ययन करून त्यावर अंमलबजावणी करण्यात येईल. जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी ठाणे प्रमुख आणित चौकशी अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले आहे. अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी आपण गंभीर असून आवश्यक तिथे स्वत: धाड घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात महिला अत्याचाराचे गुन्हे कमी करण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी योजना तयार करण्याची गरज आहे. घरगुती हिंसा प्रतिबंधक कायद्याची अंमलबजावणी प्रभावीरित्या होत नाही. यासाठी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देऊन पोलीस ठाण्यात दाखल होणारे आणि घरगुती हिंसेच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेण्यात येईल. भंडारा जिल्ह्यात २०१४ च्या तुलनेत २०१५ मध्ये गुन्ह्याचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा गुन्ह्याचा आलेख आणखी कमी करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. वाहतूक नियंत्रणासंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, राष्ट्रीय महामार्गावर भंडारा शहर वसलेले आहे. परंतु शहरातील सहा किलोमीटर रस्त्याचे चौपदरीकरण झालेले नाही. भरधाव वाहनांमुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचा धोका अधिक असतो. याविषयी वाहतूक विभागाशी चर्चा करून या समस्येवर मार्ग शोधण्यात येईल. सुरक्षेच्या दृष्टिने ज्याठिकाणी पोलिसांकडून दुर्लक्ष होत आहे त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्र परिषदेला अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)
वाहतूक समस्या, महिला अत्याचारावर प्रतिबंध आणू
By admin | Published: December 31, 2015 12:27 AM