कर्मचाऱ्यांसाेबतच अनेक विद्यार्थीही सावकारीच्या जाळ्यात अडकले आहेत. माैजमजा करण्यासाठी जवळच्या मित्राकडून घेतलेले एक दाेन हजार रुपयेच फिटता फिटत नाहीत. घरची परिस्थिती बेताची असताना खर्च माेठा करतात. यासाठी सावकाराकडून पैसे घेतात. तुमसर तालुक्यातील दावेझरी येथील आदित्य एकनाथ चाैरागडे हा विद्यार्थी अवैध सावकारीचा बळी ठरला. अकरावीत असणाऱ्या आदित्यने एक हजार रुपये घेतले हाेते. नियमित पैसे परत करण्यासाठी ताे व्याजाच्या चक्रव्यूहात अडकला. एक हजार रुपये फेडण्यासाठी त्याने आपल्या अंगावर ४९ हजारांचे कर्ज करून ठेवले. येणाऱ्या धमक्यामुळे मानसिक स्थिती बिघडली आणि १ सप्टेंबर राेजी त्याने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकारानंतर त्याच्या वडिलाने पाेलीस ठाण्याचे दार ठाेठावले. परंतु, अद्यापही कुणावर कारवाई झाली नाही. आदित्यसारखे अनेक विद्यार्थी आज सावकारीच्या जाचाने ताेंड लपून फिरत आहेत.
बाॅक्स
व्याजाचा दर २० टक्क्यांपर्यंत
अवैध सावकारी दरमहा व्याजाचा दर २० टक्क्यांपर्यंत आहे. व्याजाने घेतलेली रक्कम अल्प राहत असल्याने त्याचे व्याजही सुरुवातीला कमी दिसते. एखाद्याने दाेन हजार रुपये घेतले तर त्यावरील व्याज दरमहा ३०० ते ४०० रुपये येतात. सुरुवातीला नियमित व्याज दिले जाते. मात्र, एखादा हप्ता थकला की मग व्याज मुद्दलात वाढवून त्यावर पुन्हा व्याजाची वसुली केली जाते. सावकाराचा पैसा मात्र फिटता फिटत नाही. या सर्व प्रकारावर कुणाचाही अंकुश नाही. विशेष म्हणजे, याची कोणती पावतीही नसते. परंतु, सावकाराची डायरी बघितल्यास सर्व काही दिसून येते.
बाॅक्स
वसुलीसाठी वाहन नेतात उचलून
कर्जाचे पैसे थकले की, वसुलीसाठी तगादा लावताे. सुरुवातीला बाहेर भेटणारा सावकार थेट घरापर्यंत पाेहाेचताे. घरच्या मंडळीसाेबत अपमानास्पद बाेलताे. यानंतरही पैसे वसूल हाेत नसेल तर घरी असलेले दुचाकीसारखे वाहन उचलून नेताे. अनेक विद्यार्थ्यांच्या दुचाकी आज सावकारांकडे दिसून येतात. पैसे परत केल्यानंतर मात्र वाहन परतही केले जाते. अनेकजण बदनामीच्या भीतीने काही करुन सावकाराचे पैसे फेडण्याचा प्रयत्न करतात. सावकारीची पाळेमुळे खोदून काढण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.