देवानंद नंदेश्वर भंडाराशासनाचे १६ सप्टेंबरच्या आदेशान्वये ६७ पैशांपेक्षा कमी-अधिक पैसेवारीच्या निकषानुसार जिल्ह्यात ७४ पैसे ही पैसेवारी १८ सप्टेंबरला घोषित झाली. शासनाने २३ सप्टेंबरला पैसेवारीचे सुधारित निकष मागे घेऊन प्रचलित ५० पैशांपेक्षा कमी-अधिक प्रमाणात पैसेवारी घोषित करण्याच्या शासन निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्याची सुधारीत नजर अंदाज आणेवारी ७३ पैसे आहे. यामुळे दुष्काळ स्थितीत शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. नागपूर, अमरावती व औरंगाबाद विभागाची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबरला जाहीर होत असते तर कोकण, पुणे व नाशिक विभागाची नजरअंदाज पैसेवारी १५ सप्टेंबरला जाहीर होते. राज्य शासनाला केंद्राकडे मदतीचे ज्ञापन पाठविण्याच्या अनुषंगाने चालू हंगामात ३० सप्टेंबर ऐवजी १५ सप्टेंबर ही तारीख गृहीत समजून औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागाने नजरअंदाज पैसेवारी तत्काळ जाहीर करावी, अशा सूचना महसूल विभागाच्या उपसचिवांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या. किंबहुना दुसऱ्याच दिवशी १६ सप्टेंबरला महसूल विभागाने पैसेवारीची सुधारित पध्दत जाहीर केली. ६७ पैशांपेक्षा कमी व ६७ पैशांपेक्षा अधिक पैसेवारी असलेली गावे जाहीर करण्याचे निर्देश दिलेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील ८४६ गावात सरासरी ७४ पैसेवारी जाहीर केली. पैसेवारीच्या सुधारित निकषांमुळे जिल्ह्यात दुष्काळजन्य स्थिती शासन जाहीर करणार, या आशेवर शेतकरी असताना सात दिवसांत २३ सप्टेंबरला शासनाने सुधारित पैसेवारीचा निकष मागे घेतला. ५० पैशांपेक्षा अधिक किंवा ५० पैशांपेक्षा कमी, अशी पैसेवारी जाहीर करण्याच्या सूचना सर्व विभागीय आयुक्तांना दिल्यात. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने ८४६ गावांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ७३ पैसे दर्शविली आहे. ही सर्व गावे ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी दाखविण्यात आली आहे. ५० पैसेपेक्षा जास्त पैसेवारी असलेल्या ८४६ गावांमध्ये भंडारा तालुक्यातील १६९ गावांची पैसेवारी ७२ पैसे, पवनी तालुक्यातील १४१ गावांची पैसेवारी ७४ पैसे, तुमसर तालुक्यातील १४३ गावांची पैसेवारी ७२ पैसे, मोहाडी तालुक्यातील १०८ गावांची पैसेवारी ७१ पैसे, साकोली तालुक्यातील ९४ गावांची पैसेवारी ७२ पैसे, लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांची पैसेवारी ७१ पैसे आणि लाखनी तालुक्यातील १०२ गावांची पैसेवारी ७९ पैसे दाखविण्यात आली आहे.