लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तालुक्यातील कोरंबी येथील आदिशक्ती पिंगलाई मातेचे मंदिर हे जिल्ह्यातील भाविक भक्तांचे श्रद्धास्थळ आहे. येथे दूरवरुन भक्त दर्शनासाठी येतात. मात्र या रस्त्यावर जागोजागी जीवघेणे खड्डे पडले असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर जरी डांबरीकरण झाले असले तरी ठिकठिकाणी पाणी, चिखल साचत आहे. आता दोन महिन्यानंतर नवरात्र दुर्गा उत्सवाला सुरुवात होणार आहे. मात्र या रस्त्याची अद्यापही दुरुस्ती न झाल्याने भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीधारकांना खड्डा चुकवून रस्ता शोधावा लागत आहे. विशेष म्हणजे हा मार्ग आयुध निर्माणी जवाहरनगरच्या हद्दीत येत असल्याने यावर आयुध निर्माणी प्रशासनच काम करू शकते. ही फॅक्टरी केंद्रशासनाच्या अखत्यारित येते. याच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जागोजागी खड्डे पडले असल्याने अनेक नागरिकांना अपघात येऊन अपंगत्व आलेले आहे. परिसरातील भाविक मंडळी मोठ्या संख्येने या रस्त्याने ये-जा करत असतात. मात्र कोरंभी-सालबर्डी, साहुली पिपरी, पेवठा, लोहारा या परिसरातील अनेक नागरिक भंडारा येथे कामाकरिताही जात असतात.प्रसूतीसाठी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना रस्त्याअभावी वेळेत पोहचता येत नाही. आजारी व्यक्तीचा रस्त्यातच मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काम लवकर व्हावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. आयुध निर्माणी प्रशासनाने लक्ष देत रस्त्याचे डांबरीकरण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
शहापूरचा, खरबीचा सर्व्हिस रोड धोकादायक- भंडारा तालुक्यातील शहापूर येथील सर्व्हिस रोड पूर्णच खचला असून येथे रस्त्यावर खड्डे पडले असतानाही दुर्लक्ष कायम आहे. नागरिकांचा जीव गेल्यावर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा संतप्त सवाल शिवसेना पदाधिकारी यांनी केला आहे. खरबी नाका येथील सर्व्हिस रस्ताही खड्ड्यात गेल्याने अनेकांना दुखापत झाली आहे. याकडे प्रशासनाचे अनेक दिवसापासून दुर्लक्ष होत आहे. अनेकदा ट्रकचालक महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्व्हिस रोडवरच वाहने उभी करतात. महामार्गावर थांबणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करून शहापूर येथील सर्व्हिस रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी शिवसेना विभागप्रमुख संजय आकरे यांनी निवेदनातून केली आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल गायधने, शहापूरचे नरेश लांजेवार, मोरेश्वर हटवार, नीलेश मोथरकर, अमोल जौंजाळ, सुनील सोमनाथे आदींनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
बळीराजा अनेक वर्षापासून त्रस्त कोरंबी परिसरातील अनेक शेतकरी या रस्त्याने ये जा करतात. त्यांना अनेकदा भंडारा शहरात विविध कामांसाठी याच रस्त्याने यावे लागते. परंतु खड्डेमय रस्त्यांवरुन खते, बियाणे, शेती अवजारे नेताना खरीप हंगामात शेतकरी पुरते मेटाकुटीला आले आहेत. आयुध निर्माणी प्रशासन बळीराजाचा जीव जाण्याचा वाट पाहत आहे काय असा प्रश्न परिसरातील शेतकरी, शेतमजूर महिला विचारत आहेत. गणेशपूर येथूनही अनेक महिला शेतीकामांसाठी याच रस्त्याने प्रवास करतात. त्यामुळे हा रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे.
भंडारा नागपूर महामार्गावरील मुजबी, ठाणा, खरबी (नाका) येथे सर्विस रोडवरच वाहने उभी असतात. यामुळे स्थानिक वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. परिसरात अनेक अपघाताच्या घटना घडल्यावरही या सर्विस रस्त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यांवरच उभ्या होणाऱ्या वाहनांवर महामार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याची गरज आहे. मात्र महामार्ग पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. - संजय आकरे,उपसरपंच, खरबी (नाका)