लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहरात होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी दीर्घ प्रयत्नानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या बायपास रस्त्याला मंजुरी मिळाली. सहा पदरी बायपाससाठी आता शिंगोरी ते मुजबी या दरम्यानच्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. यापूर्वीही निलज - कारधा आणि तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी वृक्ष तोडण्यात आले. परंतु अद्याप तरी तेथे वृक्षारोपण झाले नाही. अशीच अवस्था या बायपासचीही होणार आहे.राष्ट्रीय महामार्गाचा हा बायपास १४.८० किलोमीटर लांबीचा असून ४२१ कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात येणार आहे. महिनाभरापूर्वी या बायपासच्या कामाचे उद्घाटन होऊन कामाला सुरुवातही झाली आहे. मात्र आता बायपास तयार करण्यासाठी या परिसरात असलेल्या शेकडो वृक्षांची कत्तल केली जात आहे. वड, निंब, बाभूळ यासह विविध जातींचे वृक्ष यंत्राच्या साहाय्याने तोडले जात आहेत. निर्माणाधीन बायपास परिसरात रस्त्याच्या कडेला तुटलेले वृक्ष पडून आहेत. यापूर्वी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करण्यात आले होते. निलज-कारधा या महामार्गासाठी रस्त्यावरील डेरेदार वृक्ष तोडण्यात आले. तसेच तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गासाठी शेकडो वृक्षांची कत्तल झाली. पर्यावरणवाद्यांनी आवाज उठविल्यावर वृक्ष लागवड केली जाईल असे सांगण्यात आले. परंतु तेथे अद्यापपर्यंत वृक्षांची लागवड झाली नाही. अशीच अवस्था या बायपासची होईल आणि हिरवीगार वनराई नष्ट होऊन हा परिसर उजाड होण्याची शक्यता आहे.
गावकऱ्यांनी जोपासली मुलाप्रमाणे झाडे- भंडारालगतच्या भिलेवाडा परिसरात वेगाने बायपासचे काम सुरू आहे. यासाठी वृक्षांची कत्तल केली जात आहे. नागरिकांनी आपल्या मुलाप्रमाणे या वृक्षांना वाढविले. परंतु आता आधुनिकतेच्या नावाखाली त्यांच्या डोळ्यासमोर कत्तल होत आहे.