अशोक पारधी।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : प्रत्येक माणूस उपजीविकेसाठी कोणते ना कोणते काम करीत असतो. कुणी प्रशिक्षण घेऊन कला अवगत करतात तर कुणी अनुभवाने कला विकसित करतात. प्रशिक्षण किंवा कोणताही अनुभव नसताना विविध कामात पारंगत असलेले अनेकजण आजही दुर्लक्षित आहेत. पवनी तालुक्यातील खांबाडी (पेंढरी) येथील अमरकंठ खोब्रागडे या हरहुन्नरी कारागिराकडे पाहिल्यानंतर अशा कारागीरांना दाद द्यावीशी वाटते.पवनी तालुक्यातील खांबाडी (पेंढरी) येथील रहिवाशी असलेले ५५ वर्षीय अमरकंठ हे सहाव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेऊन घराबाहेर पडले. इतरांना काम करताना पाहून ते प्रत्येक काम आपल्याला करता यावे, असा प्रयत्न केला. मागील २० ते २५ वर्षात विविध प्रकारची कामे शिकून ते करण्याचा अविरत प्रयत्न सुरु ठेवला. पूर्वी शासकीय कार्यालयात केनद्वारे विणलेल्या खुर्च्या वापरण्यात येत होते. त्यांनी एका महिलेला खुर्चीला केनद्वारे विणताना पाहिले व त्यानंतर स्वत: केनचा वापर करून खुर्च्या विणायला शिकले. सोफा, दिवाण, खाट बनविणे व दुरूस्ती करणे, हार्मोनियम, तबला दुरूस्ती करणे, बांबू कलेद्वारे विविध कलाकुसर करणे, झाडावर बांबूची झोपडी बनविणे, कवेलूचे घर फेरणे, घरातील टाकावू वस्तूपासून शोभेच्या वस्तू बनविणे व ज्यांच्यासाठी त्या बनविलेल्या त्याची मजुरी म्हणून त्यांनी दिलेली रक्कम निमूटपणे घेणे अशी कामे करतात. पवनी-कारधा राज्यमार्गाच्या बाजूला एका झाडाखाली बसून अमरकंठ काम करतात. शासनाच्या एकाही योजनेचा लाभ त्यांना मिळाला नाही.अमरावती जिल्ह्यातील सावंगपूर येथील अवधूत महाराज यांच्या प्रेरणेमुळे त्याच्या जीवनाविषयीच्या भावना बदलल्या असल्याचे ते सांगतात.भंडारा, नागपूर अशा अनेक ठिकाणी प्लास्टीक, लाकडीकाम कारखान्यात काम करण्याची संधी मिळाली. परंतु १०-११ वर्षे काम केल्यानंतरही ३०० रूपये प्रती महिन्यापेक्षा जास्त पैसे कधी मिळाली नाही. आर्थिक विवंचनेमुळे पत्नीसोबत पटले नाही. त्यामुळे एक मुलगा व दोन मुलींना सोबत घेऊन ते संसाराचा गाढा ओढत आहेत. परंतु त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाही. सर्वसाधारण माणसापासून बड्या अधिकाऱ्यापर्यंत कामाच्या पद्धतीमुळे त्यांनी संबंध जोपासले आहेत. परंतु संबंधाचा गैरफायदा घेऊन स्वत:चा फायदा करून घ्यावा, असे त्यांच्या मनाला कधीही शिवले नाही. त्यामुळे पवनी नगरातील १८ वर्षाच्या प्रवासात त्यांचे स्वत:चे घर नाही. स्वत:चे दुकान नाही. निळा झेंडा लावलेले काटउमरीचे झाड हीच त्याची कर्मभूमी ठरली आहे.
काटउमरीचे झाड ठरले ‘त्याची’ कर्मभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:42 PM
प्रत्येक माणूस उपजीविकेसाठी कोणते ना कोणते काम करीत असतो. कुणी प्रशिक्षण घेऊन कला अवगत करतात तर कुणी अनुभवाने कला विकसित करतात.
ठळक मुद्देलोकमत प्रेरणादायी प्रवास : हरहुन्नरी कारागीर शासकीय मदतीपासून वंचित