शहापूर : रक्षाबंधन सण हा बहीण आणि भाऊ यांच्यामधील प्रेमाचे प्रतीक आहे. त्याचबरोबरीने वृक्ष हेसुद्धा आपले सखा आहेत. ऊन, वारा, थंडी पाऊस, प्रदूषण यांपासून ते आपले सतत संरक्षण करीत असतात. त्यामुळे त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तव्य आहे. रक्षाबंधनानिमित्त आपण एक तरी झाड लावून त्याला राखी बांधून त्याचे संवर्धन करावे, असे आवाहन ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अनिल सोले यांनी केले.
रक्षाबंधनानिमित्त शहापूर येथील डिफेन्स सर्विसेस ॲकॅडमी येथे ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशन, नागपूर आणि डिफेन्स सर्विसेस ॲकॅडमी, शहापूर यांच्या विद्यमाने वृक्षारोपण आणि वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून खासदार सुनील मेंढे, तर अध्यक्षस्थानी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अनिल सोले हे होते. खासदार मेंढे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक सार्वजनिक बगीचा आणि शाळा यात वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचा प्रकल्प ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने राबविला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. प्रारंभी सर्व उपस्थित पाहुणे, विद्यार्थी आणि पालक सर्वांना राख्या बांधण्यात आल्या. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. डिफेन्स सर्विसेस ॲकॅडमीचे संस्थापक प्रा. नरेंद्र पालांदूरकर यांनी शाल व पुष्पगुछ देऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
त्यानंतर डिफेन्स सर्विसेस ॲकॅडमीच्या परिसरात पाहुण्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून प्रत्येक वृक्षाला राखी बांधण्यात आली. याप्रसंगी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने डिफेन्स ॲकॅडमीच्या सहा एकर परिसरात वृक्षारोपण करून संपूर्ण परिसर हिरवागार करण्यात येईल, असा संकल्प डिफेन्स सर्विसेस ॲकॅडमीचे संस्थापक प्राचार्य प्रा. नरेंद्र पालांदूरकर यांनी व्यक्त केला. याप्रसंगी ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे सचिव विजय फडणीस, कोषाध्यक्ष योगेश बन, उपाध्यक्ष आशिष वंदिले, तांत्रिक सहाय्यक माहुरकर, डिफेन्स सर्विसेस अकॅडमीचे संस्थापक प्रा. नरेंद्र पालांदूरकर, प्राचार्या प्रा. वंदना लुटे, संचालिका स्मिता पालांदूरकर, प्रशिक्षण अधिकारी कटरे, श्रीकांत हरडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि संचालन ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे भंडारा जिल्हा संयोजक प्रा. डॉ. पितांबर उरकुडे यांनी केले.